नवी दिल्ली : इराणच्या अणू कार्यक्रमावरुन अमेरिका आणि इस्त्रायलनं त्यांच्यावर हल्ले केले होते. इराणकडे आतापर्यंत युरेनियमचा साठा किती आहे? ते किती बॉम्ब तयार करु शकतात. याबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरु आहे. आंतरराष्ट्रीय परमाणु ऊर्जा एजन्सी म्हणजेच IAEA सातत्यानं त्यांच्या रिपोर्टमधून याबाबत चिंता व्यक्त केली आहे. इराणकडून यावेळी अणू संशोधनाचा कार्यक्रम फक्त वीज निर्मिती आणि वैद्यकीय संशोधनासाठी करत असल्याचं म्हटलंय.
एखाद्या देशाला अणवस्त्र तयार करायचं असल्यास ते संवर्धित करावं लागतं. प्रामुख्यानं वीज निर्मितीसाठी 3.6 टक्के संवर्धित युरेनियम आवश्क असते. इराणनं त्यापेक्षा अधिक प्रमाणात युरेनियम संवर्धित केलं आहे. इराण अणवस्त्र निर्मितीच्या जवळ पोहोचल्याचे दावे केले जातात.
इराणकडे 60 टक्के संवर्धित केलेल्या युरेनियमचा साठा 440 किलो आहे. अणू संशोधकांच्या मते 60 टक्के संवर्धित युरेनियमची शस्त्र बनवण्यासाठी 90 टक्क्यांपर्यंत ते संवर्धित करावं लागते. 60 टक्क्यांवरुन 90 टक्क्यांपर्यंत पोहोचण्यास कमी वेळ आणि किरकोळ तांत्रिक प्रक्रिया करावी लागते. यामुळं जगभरातील गुप्तचर यंत्रणा इराणच्या 440 किलोच्या साठ्याकडे लक्ष ठेऊन आहेत.
इराणच्या अणू केंद्रांमध्ये फक्त 60 टक्क्यांपेक्षा अधिक संवर्धित युरेनियमशिवाय इतर संवर्धित यूरेनियमचा साठा आहे. 20 टक्के संवर्धित युरेनियम 1000 किलो, 3.6 टक्के युरेनियम 8500 किलो आहे. 3.6 टक्के युरेनियम नागरी कामांसाठी वापरले जात असले तर इराणकडे मोठ्या प्रमाणावर कच्चा माल असल्याचं म्हटलं जातं.
आंतरराष्ट्रीय संरक्षणविषयक तज्ज्ञ आणि संशोधकांच्या आकलनानुसार इराण त्यांच्या सर्व संवर्धित युरेनियमला 90 टक्क्यांपर्यंत संवर्धित करु शकला तर ते 5 ते 8 अणवस्त्र तयार करु शकतात.यामुळं आखाती देशातील राजकीय गणितं बदलू शकतात.
इराणकडून त्यांचं संवर्धित युरेनियमचा बहुतांश साठा इस्फहान या सुरक्षित ठेवण्यात आलं आहे. इस्फहान इराणच्या तीन प्रमुख भूमिगत केंद्रांपैकी एक आहे. या केंद्रावर अमेरिका आणि इस्त्रायलकडून हल्ले करण्यात आले होते. इराणचा सातत्यानं युरेनियमचा साठा सुरक्षित राहावा यासाठी प्रयत्न सुरु आहे.
अमेरिकन संरक्षण गुप्तचर यंत्रणा म्हणजेच डीएआयच्या यूनिटनुसार इराणच्या वेगाबाबत आश्चर्यकारक बाब सांगितली आहे. इराणनं आज ठरवलं तर ते एका आठवड्यात एक अणवस्त्र बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या युरेनियमचं संवर्धन 90 टक्क्यांपर्यंत करु शकतात. या रिपोर्टनुसार आता इराणला तंत्रज्ञानाच्या बाबत रोखणं अवघड झालं आहे.
अमेरिकेच्या गुप्तचर अहवालानुसार सध्या इराण राजकीय दृष्टया थेट अणवस्त्र तयार करत नाही. त्यांनी त्याबाबत पूर्ण तयारी केली आहे, त्यानुसार अणूचं बटन दाबून ते अणूबॉम्ब तयार करु शकतात. तर, इस्त्रायलनं देखील इराणनं अणवस्त्र तयारीची प्रक्रिया खूप पुढं नेल्याचा दावा केला आहे.