बीसीसीआय निवड समितीने शनिवारी 6 जून रोजी टीम इंडियाची आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. रजत पाटीदार याने त्याच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आयपीएल स्पर्धेत सलग आणि एकूण दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकून दिली. त्यामुळे रजतला टीम इंडियात संधी मिळणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र निवड समितीने आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी रजतच्या नावाचा विचारही केला नाही. त्यामुळे बॅटिंग आणि नेतृत्वासह परिपूर्ण असलेल्या रजतला संधी का दिली गेली नाही? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.
रजत पाटीदार याला उल्लेखनीय कामगिरीनंतरही टीम इंडियात त्याची निवड न करणं चाहत्यांना काही पटलेलं नाही. रजतची निवड न केल्याबद्दल बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्टीकरण दिलंय. आगरकर यांनी काय म्हटलं हे जाणून घेऊयात. काही खेळाडूंना त्यांच्यात क्षमता असूनही संधी मिळाली नाहीय. मात्र मोजक्यात खेळाडूंनाच निवडता येतं असं आगरकर यांनी म्हटलंय.
“आम्ही अनेक खेळाडूंबाबत चर्चा करतो. फक्त 15 खेळाडूंची नावं लिहत नाही. भारतात अनेक चांगले खेळाडू आहेत. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील असे अनेक खेळाडू आहेत जे भारतीय संघात निवड होण्याच पात्र आहेत. मात्र संघात आधीपासून खेळाडू आहेत जे चांगली कामगिरी करत आहेत. आपण काही महिन्यांआधी वर्ल्ड कप जिंकला आहे. आम्ही चांगली टीम निवडली आहे. कायमच काही खेळाडू बाहेर राहतील. मात्र आम्ही या संघाबाबत फार आनंदी आहोत”, असं आगरकर यांनी नमूद केलं. आगरकर यांच्या या स्पष्टीकरणावरुन निवड समितीने रजत पाटीदार याच्याकडे दूर्लक्ष केलंय असं म्हणता येणार नाही. निवड समितीच्या या निर्णयावरुन त्यांनी संघाचं संतुलन आणि आगामी मालिकांबाबत विचार केलाय, असं स्पष्ट होतं.
रजतने आरसीबीचा आयपीएलमधील इतिहास बदललाय. आरसीबीला पहिल्या 17 वर्षांत ट्रॉफीची प्रतिक्षा करावी लागली. आरसीबीला या दरम्यान ट्रॉफीने हुलकावणी दिली. अनेक दिग्गज कर्णधार आरसीबीला ट्रॉफी जिंकून देण्यात अपयशी ठरले. मात्र रजतने त्याला नेतृत्व मिळताच पहिल्याच हंगामात इतिहास घडवला. रजतने 18 वर्षांनी आरसीबीला आयपीएल ट्रॉफी मळवून दिली. इतकंच नाही तर रजत कर्णधार म्हणून ट्रॉफी कायम राखण्यातही यशस्वी ठरला. रजत यासह आयपीएल स्पर्धेत सलग 2 वेळा आपल्या नेतृत्वात एकाच टीमला ट्रॉफी जिंकून देणारा तिसरा कर्णधार ठरला. रजतआधी रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी यांनी आपल्या नेतृत्वात एकाच टीमला आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्याची कामगिरी केली होती.
रजतने आपल्या खेळाडूंचा विश्वास जिंकला. त्यांना त्यांच्या पद्धतीने खेळण्याचं स्वातंत्र्य दिलं. इतकंच नाही तर रजतने योग्य वेळेस योग्य निर्णय घेतले. आरसीबी टीमने कामगिरीतील सातत्य कायम राखलं. तसेच आरसीबी कोणत्याही एका खेळाडूवर विसंबून राहिली नाही. प्रत्येक सामन्यात प्रत्येक खेळाडूने विजयाची जबाबदारी घेतली. सांघिक कामगिरी हे आरसीबीच्या यशाचं हे गमक ठरलं. रजतच्या या अशा कामगिरीमुळे त्यांना भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी दावा मजबूत केला होता.
रजतने मिडल ऑर्डरमध्ये अनेकदा चाबूक बॅटिंग करुन आरसीबीला मोठी धावसंख्येपर्यंत पोहचवण्यात प्रमुख भूमिका बजावली. तर रजत काही सामन्यात आरसीबीसाठी संकटमोचकही ठरला. रजतने 19 व्या मोसमात 500 पेक्षा अधिक धावा केल्या. रजतने 19 व्या मोसमातील 15 सामन्यांत 41.75 च्या सरासरीने आणि 192.69 च्या स्ट्राईक रेटने एकूण 501 धावा केल्या. रजतने या दरम्यान 5 अर्धशतकं लगावली.
मिडल ऑर्डर हा प्रत्येक संघाच्या फलंदाजीचा कणा समजला जातो. रजतने मधल्या फळीत खेळताना 7 ते 11 ओव्हरदरम्यान 190 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. तर रजतचा 12 ते 16 ओव्हर दरम्यान स्ट्राईक रेट हा 216 पेक्षा अधिक राहिला. रजत यावरुन परिस्थितीनुसार गिअर बदलण्यात माहिर असल्याचं स्पष्ट होतं. मग रजत कर्णधार आणि फलंदाज म्हणून प्रत्येक बाबतीत सरस असूनही त्याला संधी का दिली नाही? हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा उपस्थित होतो.
रजतला टीम इंडियासाठी मधल्या फळीतील फलंदाज हे त्याला संधी न मिळण्यासाठी कारणीभूत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. निवड समितीने आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या मालिकेत भारतासाठी मधल्या फळीत आश्वासक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाच संधी दिली आहे. याआधी या खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध केलंय आणि निर्णायक क्षणी बॅटिंग करुन दाखवलीय. यामध्ये नवनियुक्त टी 20i कर्णधार श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, उपकर्णधार तिलक वर्मा आणि नितीश कुमार यांचा समावेश आहे. तसेच निवड समितीने भविष्यातील क्रिकेट स्पर्धांचा विचार करुनच संघ निवडला आहे. त्यामुळे हे खेळाडू पुढील काही महिने टीम इंडियात कायम असतील असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र असंच राहिलं तर रजतला संधी मिळणारच नाही? असा प्रश्नही उपस्थित होणं स्वाभाविक आहे.
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहता त्यांनी पाटीदारच्या कामगिरीकडे दुर्लक्ष केलं नसल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे रजतने त्याच्या कामगिरीत सातत्य राखल्यास भारतीय संघात संधी मिळेल यात शंका नाही. मात्र ती संधी केव्हा मिळेल? याचं उत्तर लवकरच मिळेल अशी आशा क्रिकेट चाहत्यांना असणार आहे.