राज्यात खळबळ उडवणारी बातमी आहे. पुणे महापालिका, विधान भवन, आरएसएसच्या मुख्यालयाला उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका तसेच मुंबईतील विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर विधानभवन परिसरात पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली असून संपूर्ण परिसराला कडेकोट सुरक्षा कवच देण्यात आले आहे.
विधानभवन परिसरातील सुरक्षेत वाढधमकीची माहिती मिळताच श्वानपथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) घटनास्थळी दाखल झाले. विधानभवनाच्या आत आणि बाहेर सखोल तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असून श्वानपथकाच्या मदतीने प्रत्येक भागाची तपासणी केली जात आहे. प्रवेशद्वार, पार्किंग परिसर, कार्यालयीन विभाग तसेच सार्वजनिक वर्दळीच्या ठिकाणांची कसून झडती घेतली जात आहे. विधानभवन परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात येत असून वाहनांचीही काटेकोर पडताळणी केली जात आहे. सुरक्षा यंत्रणांकडून कोणतीही जोखीम न पत्करता खबरदारीचे सर्व उपाय राबविण्यात येत आहेत.
पुणे महापालिकेला धमकीआज महापौर कार्यालय, पुणे महानगरपालिका येथे बॉम्ब ठेवल्याबाबत धमकीचा ई-मेल आला होता. हा ईमेल कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी सकाळी 10:15 वाजता पाहिला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पुणे महानगरपालिका, नवीन इमारत, महापौर कार्यालय येथे तात्काळ बंदोबस्त लावण्यात आला. BDDS पथकाने महापौर कार्यालय व पुणे महानगरपालिकेच्या संपूर्ण इमारतीची सखोल तपासणी केली. सदर तपासणीमध्ये बॉम्ब सदृश्य किंवा कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. प्राप्त ई-मेलचा स्रोत व IP Address शोधण्यासाठी सायबर पोलीस स्टेशन मार्फत तांत्रिक तपास करण्यात आला, ही अफवा असल्याचे समोर आले आहे.
संघाचे मुख्यालय उडवण्याचाही मेलमध्ये उल्लेखपुणे महापालिकेला उडवून देण्याचा जो मेल आला होता त्यात संघ मुख्यालयचा सुद्धा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे संघ मुख्यालय, स्मृती भवन सह काही ठिकाणी चेकिंग करण्यात आली. त्यात काहीही आढळून आलं नाही. दररोज रुटीन चेकिंग सुरू असते मात्र आज मेल असल्याने अतिरिक्त चेकिंग करण्यात आली. संघ मुख्यलाय आणि परिसरात नियमीत सुरक्षा व्यवस्था लागलेली असते ते सकाळ संध्याकाळ चेकिंग करत असतात. मेलच्या अनुषंगाने सुद्धा चेकिंग करण्यात आली मात्र त्यात काहीही आढळून आलं नसल्याचं डीसीपी राहुल मदने यांनी सांगितलं आहे.