डीआरडीओची माहिती, सलग तिसऱ्यांदा परीक्षण
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आपल्या स्वदेशनिर्मित दीर्घ पल्ल्याच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण भारताने केले आहे. हे क्षेपणास्त्र ‘लाँग रेंज लँड अॅटॅक क्रूझ मिसाईल’ (एलआरएसीएम) या श्रेणीतील असून ते दीर्घ अंतरांवर असलेल्या लक्ष्यांचा अचूक भेद करु शकते, अशी माहिती देण्यात आली आहे. या क्षेपणास्त्राची निर्मिती ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’कडून (डीआरडीओ) करण्यात आला आहे.
हे परीक्षण सर्व निकषांवर यशस्वी ठरले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. हे क्षेपणास्त्र संपूर्णपणे भारतनिर्मिती असून त्याचे आतील भागही डीआरडीओच्या विविध प्रयोगशाळांमध्ये विकसीत करण्यात आले आहेत. हे परीक्षण भारताच्या तीन्ही सेनादलांच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी या यशासाठी भारताच्या संशोधकांची प्रशंसा केली आहे. या क्षेपणास्त्राचे मुख्य भाग या संस्थेच्या बेंगळूर येथील प्रयोगशाळेत विकसीत करण्यात आले असून अन्य प्रयोगशाळांचेही सहकार्य लाभले आहे.
दीर्घ पल्ल्याची मारकक्षमता
या क्षेपणास्त्राचा पल्ला 5 हजार किलोमीटरपेक्षा अधिक आहे. त्याची अचूकता आणि वेगही मोठा आहे. त्यामुळे ते आंतरखंडीय स्वरुपाचा माराही करु शकते. या क्षेपणास्त्रचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन लवकरच हाती घेण्यात येणार असून तीन्ही सेनादलांच्या मागणीनुसार ही क्षेपणास्त्रे त्यांना पुरविण्यात येणार आहेत. किती क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यात येईल, याची माहिती मात्र, देण्यात आलेली नाही.
क्षेपणास्त्र निर्मिती आत्मनिर्भरता
क्षेपणास्त्र आणि ड्रोन निर्मितीत आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने भारताची वेगाने वाटचाल होत आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये 16 वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांची निर्मिती स्वदेशात करण्यात भारताला यश आले असून त्यांच्यापैकी काही प्रकारांच्या क्षेपणास्त्रांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादनही हाती घेण्यात आले आहे. ब्राम्होस क्षेपणास्त्र हे त्यांच्यापैकी एक महत्वाचे क्षेपणास्त्र असून ते प्रथम रशियाच्या तांत्रिक सहकार्याने विकसीत करण्यात आले. तथापि, आता भारत या क्षेपणास्त्राची स्वत:च निर्मिती करण्याच्या स्थितीत आहे. नुकतेच भारताने शत्रूच्या क्षेपणास्त्रांचा आणि ड्रोन्सचा आकाशतच नाश करण्यासाठीच्या स्वदेशनिर्मित यंत्रणेचे यशस्वी परीक्षण केले आहे. या यंत्रणेची आणखी काही परीक्षणे पूर्ण झाल्यानंतर या यंत्रणेचे उत्पादन भारतातच होणार आहे. ही यंत्रणा भारताला अणुहल्ल्यापासूनही वाचवू शकते. आधुनिक युद्धतंत्राला अनुसरुन ही निर्मिती करण्यावर भारताला भर आहे.