आपण जेवणातील उरलेले पदार्थ फ्रिजमध्ये ठेवतो. त्यानंतर अनेक दिवस ते उरलेले पदार्थ गरम करून खाल्ले जातात. पण हे पदार्थ किती दिवसाच्या आत खाणे सुरक्षित आहे हेच आपल्याला माहीत नसते. त्यामुळे काहीवेळा फ्रिजमध्ये उरलेले अन्न खाल्ल्याने तब्येत बिघडते. फूड पॉयझनिंग होतं. यावर तज्त्र काय सांगतात ते बघूया.
तज्त्रांच्या मते फ्रिजमध्ये ठेवलेले सगळेच अन्न फार काळ ताजे राहत नाही. तर फ्रिजमध्ये ठेवलेल्या डाळी आणि भाज्या ३-४ दिवसांपर्यंतच खाण्यास योग्य असतात. त्यानंतर मात्र त्यात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यताही वाढते. त्यातही सध्या सुरू असलेल्या तीव्र उन्हाळ्यात जेवण बनवल्यानंतर २ ते ३ तासातच खावे. कारण शिजवलेले अन्नपदार्थ रुमच्या तापमानात २ ते ३ तासापेक्षा जास्त वेळ ठेवू नयेत. त्यातही जर जेवण उरलेच तर लवकर ते फ्रिजमध्ये ठेवावे. जर फ्रिज चांगले असेल तर त्यातील तापमानात शिजवलेले अन्न जास्तीत जास्त ३ ते ४ दिवसच खाण्यास सुरक्षित राहते.
लवकर खराब होणारे पदार्थ
तज्ज्ञांनुसार फ्रिजमध्ये जे शिजवलेले पदार्थ लवकर खराब होतात त्यात भात प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे शिजवलेला भात जर तुम्ही फ्रिजमध्ये ठेवत असाल तर तो जास्तीत जास्त तीन दिवसाच्या आता खावा. तर डाळी, आमट्या, शिजवलेल्या भाज्या ३ ते ४ दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहतात. मात्र खाण्याआधी त्या गरम करून घ्याव्यात. तसेच जर अधिक दिवसांसाठी पदार्थ फ्रिजमद्ये स्टोअर करायचे असतील तर फ्रिजरचा वापर करावा. तसेच दूधापासून बनलेले पदार्थ ,कस्टर्ड , मिठाया या लवकर खराब होतात. त्यामुळे त्या २.३ दिवसात संपवाव्यात.





