डॉ. मिलिंद नाईक प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला
जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता, आवडीनिवडी, शिकण्याची पद्धत आणि क्षमता भिन्न असतात. तरीही आधुनिक शिक्षणव्यवस्थेचा मोठा भाग सर्व विद्यार्थ्यांना एकाच चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतो. हा शिक्षण क्षेत्रातील सर्वांत मोठा विरोधाभास आहे. एकच अभ्यासक्रम, एकच पाठ्यपुस्तक, एकच अध्यापनपद्धती, एकच परीक्षा आणि यशाचे एकसारखेच मापदंड; हीच आजच्या शिक्षणव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. या व्यवस्थेला ‘साचेबद्ध शिक्षणपद्धती’ असे म्हणता येईल. ही व्यवस्था काही प्रमाणात प्रशासनिक दृष्ट्या सोयीची असली तरी ती मानवी विविधतेकडे दुर्लक्ष करणारी आहे. परिणामी अनेक विद्यार्थ्यांच्या क्षमता ना लक्षात येतात, ना विकसित होतात. उलट ठराविक क्षमताच विचारात घेतल्या जात असल्याने अनेक जण शिक्षणापासून दुरावले आणि समाजालाही त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम भोगावे लागत आहेत.
शिक्षणातील महत्त्वाचा सिद्धान्त म्हणजे प्रत्येक मूल वेगळे असते. कोणाला गणित सहज समजते, कोणाला भाषा; कोणाला प्रत्यक्ष कृतीतून शिकणे आवडते तर कोणाला वाचनातून. काही विद्यार्थी वेगाने शिकतात तर काहींना अधिक वेळ लागतो. काही विद्यार्थ्यांची सर्जनशीलता विलक्षण असते, काहींची सामाजिक कौशल्ये उत्कृष्ट असतात. अशा परिस्थितीत समानता आणि समता यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. समानता म्हणजे सर्वांना एकसारखी वागणूक देणे. उदाहरणार्थ, सर्व विद्यार्थ्यांना एकच पुस्तक, एकच शिकवण्याची पद्धत आणि एकच परीक्षा देणे. समता म्हणजे प्रत्येकाच्या गरजा, परिस्थिती आणि क्षमतांनुसार आवश्यक ती मदत उपलब्ध करणे, जेणेकरून सर्वांना प्रगतीची समान संधी मिळेल. समानता आणि समता यातील फरक समजून घेण्यासाठी भूक आणि भाकरीचे उदाहरण अत्यंत समर्पक आहे. समजा, तीन व्यक्ती आहेत. पहिल्या व्यक्तीची भूक मोठी आहे, दुसरीला मध्यम भूक आहे आणि तिसरी व्यक्तीची भूक अगदी कमी आहे. तिघांनाही प्रत्येकी दोन भाकऱ्या दिल्या, तर ती समानता ठरेल. परंतु या समान वाटपामुळे अपेक्षित परिणाम साध्य होणार नाही. म्हणजेच सर्वांना समान गोष्ट देऊनही सर्वांच्या गरजा पूर्ण होत नाहीत. याउलट, पहिल्या व्यक्तीला तिच्या भुकेनुसार तीन भाकऱ्या, दुसऱ्याला दोन भाकऱ्या आणि तिसऱ्याची भूक कमी असल्यामुळे पूर्ण भाकरी न देता आवश्यक तेवढीच दिली, तर ती समता ठरेल. येथे सर्वांना सारखे दिलेले नाही, परंतु प्रत्येकाच्या गरजेनुसार दिलेले आहे. त्यामुळे सर्वांचा अंतिम परिणाम सारखा होतो. सर्वांची भूक भागते आणि कोणालाही त्रास होत नाही.
शिक्षणातही हाच सिद्धान्त लागू होतो. सर्व विद्यार्थ्यांना एकसारखे अध्यापन, एकसारखी साधने आणि एकसारख्या अपेक्षा करणे म्हणजे समानता. परंतु काही विद्यार्थ्यांना अधिक वेळ, काहींना अतिरिक्त मार्गदर्शन, काहींना विशेष साधने, तर काहींना अधिक आव्हानात्मक संधी देणे म्हणजे समता. शिक्षणाचे उद्दिष्ट ‘सर्वांना सारखे’ असे नसून प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्यात यशस्वी होण्यासाठी आवश्यक ते साहाय्य देणे हे असले पाहिजे. म्हणूनच समानता म्हणजे सर्वांना समान भाकरी देणे, तर समता म्हणजे प्रत्येकाची भूक लक्षात घेऊन भाकरी देणे. समानतेमध्ये वाटप समान असते; समतामध्ये परिणाम न्याय्य असतो.
आजची शालेय शिक्षणव्यवस्था मोठ्या प्रमाणावर १८व्या आणि १९व्या शतकातील औद्योगिक क्रांतीच्या काळात विकसित झाली. कारखान्यात जसे एकाच प्रकारचे उत्पादन तयार केले जाते, त्याच धर्तीवर शाळांमध्येही विद्यार्थ्यांना एका विशिष्ट साच्यात घडवण्याचा प्रयत्न झाला. त्या काळातील औद्योगिक समाजासाठी ही रचना उपयुक्त ठरली. परंतु आजच्या ज्ञानाधारित, तंत्रज्ञानप्रधान आणि सतत बदलणाऱ्या जगात सर्जनशीलता, समस्या सोडविण्याची क्षमता, सहकार्य, संवादकौशल्ये आणि नवोन्मेष यांना अधिक महत्त्व आहे. त्यामुळे औद्योगिक युगातील शिक्षणपद्धती आणि आधुनिक समाजाच्या गरजा यांच्यात मोठी दरी निर्माण झाली आहे.