सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतला बार्टीच्या विविध योजनांचा आढावा
Tv9 Marathi June 18, 2026 01:45 AM

पुणे, दि. 17 जून: राज्याच्या समाजकल्याण राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा आज विधानभवन, पुणे येथील सभागृहात घेतला. या आढावा बैठकीत बार्टी संस्थेच्यावतीने स्पर्धा परीक्षा, फिलोशीप, आयबीपीएस, पोलीस भरती, जेईई, तसेच कौशल्य विकास विभागाच्यावतीने अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण, शिष्यवृत्ती, आदींची माहिती घेतली.

अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश

मंत्री माधुरी मिसाळ यांनी बार्टीने विद्यार्थ्यांना गुणात्मक व दर्जेदार प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात यावे आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या नामवंत संस्थाची निवड करावी,असे निर्देश आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. तसेच जात पडताळणी प्रक्रिया अधिकाधिक सुलभ कशी करता येईल व विद्यार्थ्यांना तात्काळ प्रमाणपत्र कसे देता येतील याबाबतही त्यांनी निर्देश दिले. प्रारंभी निबंधक डॉ.सुचिता शिंदे यांनी बार्टीचे सादरीकरण केले.

प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती

या आढावा बैठकीला समाजकल्याणच्या आयुक्त तथा बार्टीच्या प्रभारी महासंचालक श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे, बार्टीच्या निबंधक डॉ सुचिता शिंदे, विभागप्रमुख रविंद्र कदम, डॉ बबन जोगदंड, लेखाधिकारी नितीन चव्हाण यांच्यासह समाजकल्याण व बार्टी संस्थेतील अधिकारी उपस्थित होते.

बार्टी काय आहे?

बार्टी'(BARTI) म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था. ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेली एक स्वायत्त संस्था आहे. याचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्थापन झालेली ही संस्था प्रामुख्याने अनुसूचित जाती (SC) आणि वंचित घटकांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उत्थानासाठी कार्य करते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक समतेचे आणि न्यायाचे विचार संशोधन व विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या संस्थेमार्फत केले जाते. तसेच वंचित आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी आणि प्रगतीसाठी विविध योजना राबवणे. सामाजिक न्याय, विषमता, आणि वंचित घटकांच्या समस्यांवर वैज्ञानिक पद्धतीने संशोधन करणे यासाठीही ही संस्था काम करते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.