T20 World Cup, IND vs NED : भारतीय संघाचा सर्वात मोठा विजय, नेदरलँड्सला चारली धूळ! शफाली वर्माची बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही कमाल
esakal June 18, 2026 02:45 AM

Women's T20 World Cup 2026, IND W vs NED W: भारतीय महिला संघाने बुधवारी (१७ जून) महिला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत नेदलँड्सला पराभूत केले. लीड्समध्ये झालेल्या सामन्यात भारताने ९५ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाचा हा महिला टी२० वर्ल्ड कपमधील हा सर्वात मोठा विजय ठरला आहे.

तसेच भारताचा यंदाच्या टी२० वर्ल्ड कपमधील सलग दुसरा विजय ठरला. त्यामुळे भारताने त्यांच्या गटात ऑस्ट्रेलियालाही मागे टाकत अव्वल क्रमांक मिळवला आहे. भारताच्या विजयात शफाली वर्माचा मोठा वाटा राहिला. तिने फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही कमालीची कामगिरी केली.

T20 World Cup मध्ये हरमनप्रीत कौर बनली भारताची अव्वल फलंदाज, पाकिस्तानविरुद्ध खेळताना मोडला मिताली राजचा विक्रम

या सामन्यात भारतीय महिला संघाने नेदरलँड्स महिला संघासमोर २१० धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड्सला १७.३ षटकात सर्वबाद ११४ धावाच करता आल्या.

या सामन्यात नेदरलँड्सकडून हिदर सीगर्स आणि फिबी मोकनबोर यांनी सुरुवात चांगला करण्याचा प्रयत्न केला, पण ५ व्या षटकात सीगर्सला नंदिनी शर्माने २१ धावांवर माघारी धाडले. ८ व्या षटकात फिबीला दीप्ती शर्माने जेमिमाह रोड्रिग्सच्या हातून १५ धावांवर झेलबाद केले.

पण नंतर कर्णधार बेबेच डी लीड आणि स्टेर कालिस यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना धावांची गती वाढवता आली नाही. अखेर १२ व्या षटकात स्टेर कालिसला १८ धावांवर शफाली वर्माने त्रिफळाचीत केले, तर १४ व्या षटकात लीडला २८ धावांवर नंदिनी शर्मानच्या गोलंदाजीवर रिचा घोषने यष्टीचीत केले. त्यानंतर मात्र नेदरलँड्सकडून कोणालाही १० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. श्री चरणी आणि शफाली वर्मा यांनी बाकी सर्व विकेट्स घेतल्या.

Women's T20 World Cup: गतविजेत्या न्यूझीलंडचा धुव्वा उडवत श्रीलंका चमकली; इंग्लंडने आयर्लंडला नमवले पण 'या' मोठ्या धक्क्याने खळबळ!

रोबिन रायके (८), फ्रेडरिक ओव्हरडियाक (९), इरिस झ्विलिंग (८), मर्थे व्हॅन डेन राड (०), सिल्व्हर सीगर्स (१), इसाबेल व्हॅन डर वोनिंग (०) यांनी स्वस्तात विकेट्स गमावल्या. नेदरलँड्सने ९६ धावांवर चौथी विकेट गमावल्यानंतर १८ धावात बाकी सर्व विकेट्स गमावल्या.

भारताकडून श्री चरणीने ४ विकेट्स घेतल्या, तर शफाली वर्माने ३ विकेट्स घेतल्या. नंदिनी शर्मानेही २ विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद २०९ धावा केल्या होत्या. भारताकडून स्मृती मानधनाने ४७ चेंडूत ११ चौकार आणि १ षटकारासह ७४ धावांची खेळी केली. शफाली वर्माने ३८ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. या दोघींनी सलामीला ११५ धावांची भागीदारीही केली. या दोघींशिवाय जेमिमाह रोड्रिगसने १९, रिचा घोष नाबाद २० धावा आणि दीप्ती शर्माने नाबाद १० धावा केल्या.

नेदरलँड्सकडून कॅरोलिन डी लँगने २ विकेट्स घेतल्या. मर्थे व्हॅन डेन राड, हेदर सीगर्स, इरिस झ्विलिंग यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.