Pune Water Protest: पुण्यात तीव्र पाणीटंचाई; काँग्रेसचे रिकाम्या घागरींसह महापालिकेत हंडा आंदोलन
esakal June 18, 2026 02:45 AM

पुणे : शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याच्या विरोधात आज (ता. १७) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी रिकाम्या घागरी घेऊन पाणी देण्याची मागणी करण्यात आली.

महापालिकेने शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरु केला आहे. या पाणी कपातीमुळे अनेक भागात अर्धा तास देखील पाणी मिळत नाही, त्याच प्रमाणे गढूळ पाणी येणे, अवेळी पाणी येत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. याकडे काँग्रेसने महापौर मंजूषा नागपुरे यांच्या आसनापुढे येऊन हातात फ्लेक्स व घागरी घेऊन गटनेते रामचंद्र कदम यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. महापौर नागपुरे यांनी पाणी टंचाईवर नगरसेवकांना सभागृहात बोलण्याची संधी दिली जाईल असे आश्‍वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

महापालिकेला चौथे अतिरिक्त आयुक्त मिळाले

पाणी प्रश्नावर चर्चा सुरु असताना सभागृहनेते गणेश बिडकर यांनी प्रशासनावर केवळ टीका न करता उपाययोजना सुचवाव्यात. पाणी टंचाई तीव्र असल्याने आपल्या सर्वांना सोबत काम करावे लागेल असे सांगितले. त्यावर अरविंद शिंदे यांनी टीका केली. पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन केले नाही ही चूक कोणाची, ही नियोजनाची जबाबदारी कोणाची होती?, अधिकारी फोन उचलत नाहीत ही चूक कोणाची असे प्रश्‍न उपस्थित करत प्रशासनाला जाब विचारायचे नाहीत असे सभागृहनेते सांगत आहेत. जो पर्यंत पाणी मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही बोलत राहू असे सांगतानाच सभागृहनेत्यांचा खुलासा ऐकून महापालिकेला चौथे अतिरिक्त आयुक्त मिळाले आहेत असे वाटते असा टोला लगावला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.