सोलापुरातील ज्वेलर्स दुकानात जबरी चोरी! शहर गुन्हे शाखेच्या ४ पथकांची ४८ तास मेहनत, २५० 'CCTV' तपासले, खबरे कामाला लावले अन्‌ दोघे पकडलेच; कसा रचला प्लॅन, वाचा...
esakal June 18, 2026 02:45 AM

सोलापूर : शहरातील ७० फूट रोडवरील शिवकुमार ज्वेलर्स दुकानातून भर दुपारी साडेबाराच्या सुमारास पिस्टलचा धाक दाखवून पाच लाखांचे दागिने चोरणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात आले. शहर गुन्हे शाखेच्या पथकांनी चार दिवस मेहनत करून दोघांना शोधून काढले. एकजण ७० फूट रोड पसिरातील तर दुसरा सलगरवाडीतील आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली पिस्टल, तीन जिवंत काडतुसे, चार लाख ९४ हजार रुपयांचे दागिने, दोन मोबाईल, दुचाकी, असा एकूण सहा लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मूळचे सोलापूरचे असलेले जिलानी म. रफिक दामटे (वय ३३) व साहिल उर्फ भाई नबी नंदियाल (वय २४) हे पुण्यातील येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर झोपडपट्टीत राहायला होते. त्याठिकाणी त्यांची ओळख रेहान ऊर्फ जड्ड्या रमजान लडाफ ऊर्फ शेख याच्यासोबत झाली. त्यांनी मिळून अनेक ठिकाणी चोरी केली. त्यांनी सोलापुरातील शिवकुमार ज्वेलर्समध्ये जबरी चोरी केली. पोलिस आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत चोरट्यांच्या शोधाचे आदेश दिले.

शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक शंकर धायगुडे, शैलेश खेडकर, निलेश पाटील-सोनवणे, तुकाराम घाडगे यांच्या पथकाने चार दिवस रात्रंदिवस तपास केला. अंमलदारांनीही त्यांना साथ दिली. दरोडेखोरांच्या शोधासाठी त्यांनी तब्बल २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पडताळले. पोलिसांना दोघांची ओळख पटली आणि त्यांना सोलापुरातच ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपास केल्यावर त्यांनी चोरीची कबुली दिली.

पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, प्रीतम यावलकर, सहायक पोलिस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोरट्यांना पकडले. आता पोलिस फरार झालेल्या रेहान शेख याचा शोध घेत आहेत.

आधी केली रेकी, नंतर चोरली दुचाकी अन्‌ ज्वेलर्स दुकानात जबरी चोरी

जिलानी, साहिल व रेहान या तिघांनी मिळून सोलापुरातील सराफ दुकान लुटण्याचा प्लॅन आखला. ९ जूनला तिघेही सोलापुरात जमले. त्यांनी ७० फूट रोडवरील शिवकुमार ज्वेलर्स दुकानाची त्यांनी रेकी (पाहणी) केली. गुन्हा करण्यासाठी साहिल व रेहान यांनी १२ जूनला कुर्डुवाडीतून एक दुचाकी (एमएच १२, पीएम १८७७) चोरली. त्याच रात्री ते सोलापुरात आले आणि १३ जूनच्या दुपारी साडेबाराच्या सुमारास ज्वेलर्स दुकानात जबरी चोरी केली. जिलानी यापूर्वी ७० फूट रोड परिसरातील नुरुल इस्लाम मशिदीजवळील बोळात राहायला होता. त्यामुळे त्याला त्या परिसराची माहिती होती. चोरी करून तिघेही बोळात शिरले आणि कपडे बदलून पसार झाले होते.

‘या’ अधिकारी, अंमलदारांची कौतुकास्पद कामगिरी

पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, प्रीतम यावलकर, सहायक पोलिस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक शंकर धायगुडे, शैलेश खेडकर, निलेश पाटील सोनवणे, तुकाराम घाडगे यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली. पोलिस अंमलदार नंदराम गायकवाड, अंकुश भोसले, जावेद जमादार, धीरज सातपुते, इम्रान जमादार, अनिल जाधव, विठ्ठल यलमार, विनोद रजपूत, सिद्धाराम देशमुख, विजयकुमार वाळके, तात्यासाहेब पाटील, अजिंक्य माने, संजय साळुंखे, उमेश पवार, अभिजीत धायगुडे, आबाजी सावळे, काशिनाथ वाघे, भारत पाटील, वसिम शेख, राजकुमार वाघमारे, महेश रोकडे, सुभाष मुंढे, राजकुमार पवार, शैलेश बुगड, महेश शिंदे, महेश पाटील, विद्यासागर मोहिते, वाजीद पटेल, योगेश बर्डे, राहुल तोगे, अभिजीत पवार, सायबर पोलिसांकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, नानासाहेब काळे, चालक सतीश काटे, बाळासाहेब काळे, फरदीन शेख यांचीही मेहनत या गुन्ह्यात मोलाची ठरली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.