'राजा शिवाजी' सिनेमाचे धमाकेदार 50 दिवस, बॉक्स ऑफिसवर रचला 100 कोटींच्या विक्रम, अन् आता...
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क June 19, 2026 04:43 PM

Raja Shivaji Box Office Collection: महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर 1 मे 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या भव्य ऐतिहासिक सिनेमानं आज चित्रपटगृहांमधील यशस्वी 50 दिवस पूर्ण करत मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या. मात्र प्रदर्शित झाल्यानंतर 'राजा शिवाजी'नं त्या सर्व अपेक्षांनाही मागे टाकत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश संपादन केलं.

रितेश विलासराव देशमुख (Riteish Vilasrao Deshmukh) यांच्या दिग्दर्शनातून साकारलेला आणि त्यांच्या प्रमुख भूमिकेने सजलेला हा चित्रपट जगभरात 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणारा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. मात्र, 'राजा शिवाजी'चे यश केवळ आर्थिक आकडेवारीपुरते मर्यादित नाही. गेल्या 50 दिवसांत या चित्रपटाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रभाव नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. 'हिंदवी स्वराज्या'ची प्रेरणा, स्वाभिमानाची भावना आणि इतिहासाबद्दलचा अभिमान पुन्हा एकदा जनमानसात जागवण्यात या चित्रपटाला मोठं यश मिळालं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे नेतृत्व, दूरदृष्टी आणि रयतेच्या कल्याणासाठीचा त्यांचा संघर्ष यांचे भव्य चित्रण ‘राजा शिवाजी’मधून करण्यात आले आहे. इतिहासातील महत्त्वपूर्ण प्रसंगांना आधुनिक तंत्रज्ञान, नेत्रदीपक दृश्यरचना आणि प्रभावी कथनशैलीची जोड देत या चित्रपटाने प्रेक्षकांना एका विलक्षण ऐतिहासिक अनुभवाची अनुभूती दिली. त्यामुळेच सर्व वयोगटातील प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला असून आजही अनेक चित्रपटगृहांमध्ये ‘राजा शिवाजी’ची यशस्वी घोडदौड सुरू आहे.

या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची भक्कम फळी. रितेश विलासराव देशमुख यांच्यासह संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलिया देशमुख या कलाकारांनी साकारलेल्या भूमिका चित्रपटाच्या भव्यतेत अधिक भर घालतात.

'जिओ स्टुडिओज' प्रस्तुत आणि 'मुंबई फिल्म कंपनी' निर्मित 'राजा शिवाजी'ची निर्मिती ज्योती देशपांडे आणि जिनिलिया देशमुख यांनी केली आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये जगभर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ व्यावसायिक यशाची नवी शिखरे गाठली नाहीत, तर इतिहासाविषयीची जाणीव, सांस्कृतिक अभिमान आणि छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेला आदर यांनाही नव्या उंचीवर नेले आहे.

चित्रपटगृहांमधील 50 दिवसांचा टप्पा पार करताना 'राजा शिवाजी' हा केवळ एक यशस्वी चित्रपट म्हणून नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली वारशाला वाहिलेली एक भव्य आदरांजली म्हणून ओळखला जात आहे. प्रेक्षकांचे प्रेम, कलाकारांचे समर्पण आणि 'जिओ स्टुडिओज' तसेच 'मुंबई फिल्म कंपनी'च्या भव्य दृष्टिकोनातून साकारलेली ही महागाथा मराठी चित्रपटसृष्टीतील एक मैलाचा दगड ठरली आहे. 

Welcome To The Jungle Amruta Fadnavis Latest Song: 'वेलकम टू द जंगल'चं नवं गाणं चर्चेत; अमृता फडणवीस यांचा सुरेल ठसा, 'दीवाने हैं' गाण्यात अक्षय-रवीनाच्या केमिस्ट्रीची जुनी जादू

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.