पुणे - जिल्ह्यात मंगळवारी (ता.२३) पडलेल्या पावसाच्या सुखसरींमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. भात रोपांना संजीवनी मिळल्याने उत्पादकांनी समाधान व्यक्त केले आहे. पावसामुळे ओलावा निर्माण होणार असल्याने खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार आहे. जलधारा बरसल्याने खाचरांमध्ये पाणी साचले होते.
नारायणगाव परिसरामध्ये खरिपाच्या आशा पल्लवित
नारायणगाव - नारायणगाव, वारूळवाडी, मांजरवाडी, येडगाव, गुंजाळवाडी परिसरात मंगळवारी (ता.२३) सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान एक तास मुसळधार पाऊस पडला. पाऊस झाल्याने शेतकरीवर्ग सुखावला असून, खरीप पिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात सोमवारी (ता. २२) ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस झाला होता. मात्र नारायणगाव परिसरास पावसाने हुलकावणी दिली होती. तालुक्याच्या पूर्व भागात २२ मे २०२६ रोजी गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर दोन जून २०२६ रोजी नारायणगाव परिसर व मध्य भागातील काही गावांत गारपिटीसह वादळी पाऊस झाला होता. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीची कामे लांबली होती. शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतीक्षेत होता. वातावरणात अल्हाददायक गारवा निर्माण झाला आहे. आता खरीप पिकांच्या पेरणीच्या कामाला चालना मिळणार आहे.
शिरापुरात शेतकरी सुखावला
देऊळगाव राजे - शिरापूर (ता. दौंड) परिसरात मंगळवारी (ता.२३) दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. मात्र, आज जलधारा बरसल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
देऊळगावराजे, हिंगणीबेर्डी, शिरापूर, काळेवाडी, मलठण, बोरीबेल, रावणगाव, खडकी, नंदादेवी या गावात समाधानकारक पाऊस पडला. यामुळे खरिपाच्या पेरण्या होण्यास मदत होणार आहे. शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. शेतकरी कित्येक दिवसांपासून चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होता. मात्र काल झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. काळेवाडी चौफुला रस्त्यावर वादळी वाऱ्यामुळे मोठे झाड पडल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागत आहे.
आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा
फुलवडे - आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात मंगळवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. परंतु अपेक्षित पाऊस न पडल्याने येथील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेतच आहेत. डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. मात्र, अद्याप दमदार आणि सलग पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. खरिपाची तयारी बहुतांश शेतकऱ्यांनी केली असून समाधानकारक पाऊस पडण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
मंचर परिसरात वातावरणात गारवा
मंचर - गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या मंचर शहर व परिसराला मंगळवारी (ता. २३) पावसाने दिलासा दिला. दिवसभरात तीन वेळा झालेल्या जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, रात्री साडेआठपर्यंत ४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
मंगळवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर दुपारी व संध्याकाळी पुन्हा जोरदार सरी कोसळल्या. रात्री साडेसात ते रात्री आठच्या सुमारास झालेल्या पावसाने शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते, तर काही ठिकाणी पाणी वाहत असल्याचे चित्र दिसून आले. मंचरसह पिंपळगाव, अवसरी खुर्द, आदर्श गाव गावडेवाडी, चांडोली खुर्द, सुलतानपूर, श्रीक्षेत्र वडगाव काशिंबे, एकलहरे, तांबडे मळा, शेवाळवाडी आणि भोरवाडी परिसरातही पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खरीप हंगामातील पेरण्यांना वेग येण्यासाठी तसेच सध्या शेतात असलेल्या भाजीपाला, तरकारी पिके आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी लागवड केलेल्या गवताला या पावसाचा मोठा फायदा होणार असल्याचे अवसरी खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद कराळे यांनी सांगितले.
भात उत्पादकांना दिलासा
हिर्डोशी - भोर तालुक्यातील हिर्डोशी भागात दोन दिवसांपासून हुलकावणी देत असलेल्या पावसाने अखेर मंगळवारी (ता.२४) सकाळपासून हजेरी लावली. त्यामुळे धुळवाफेत पेरलेल्या भाताला पाणी मिळाल्याने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. पुढील दोन-चार दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यावर तरव्यांची उगवण चांगली होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
यंदा पावसाने ओढ दिल्याने तरव्यांची उगवण झाली नाही. मागील दोन दिवस हुलकावणी देणाऱ्या पावसाने भोर शहरासह पश्चिम भागात मंगळवारी हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
भोर तालुक्यात भात हेच प्रमुख पीक असून ७५०० हेक्टरवर भात लागवड केली जाते. हिर्डोशी खोऱ्यासह पश्चिम भागात धुळवाफेत पेरणी करून वीस पंचवीस दिवस होऊनही पाऊस पडला नव्हता. त्यामुळे पेरलेल्या बियाण्याचे पक्ष्यांनी खाऊन नुकसान केल्याने बियाणे काहीअंशी वाया गेले. तर उर्वरित बी शंभर टक्के उगवेलच याची खात्री नाही. त्यामुळे लावणीला रोपांचा तुटवडा भासणार आहे.
पुढील काळात होणाऱ्या पावसावर व तरव्यांच्या उगवणीवर भात शेतीचे भवितव्य अवलंबून असल्याचे हिर्डोशीतील शेतकरी बाळासाहेब धामुनसे, मारुती धामुनसे यांनी सांगितले. दरम्यान, आज पडलेला पाऊस समाधानकारक झाला असून उद्यापासून महुडे भागात पेरणीला सुरुवात होईल असे नांदचे माऊली दुधाणे यांनी सांगितले.
...तर तरवे लवकरच लावणीयोग्य
नांदगाव, आपटी, निगुडघर, नांद, शिंद आदी गावात सिंचनाच्या पाण्यावर उगवलेल्या भात तरव्यांना मुबलक पाणीपुरवठा होत नव्हता. त्यामुळे पाण्याअभावी उगवलेले तरवे वाया जाण्याची भीती निर्माण झाली असतानाच पावसाने हजेरी लावल्याने तरव्यांना फायदा होणार आहे. पावसाने योग्य साथ दिली तर हे तरवे लवकर लावणीयोग्य तयार होतील, असे आपटीचे शंकर पारठे यांनी सांगितले.
ओतूरला दुसऱ्या दिवशीही हजेरी
ओतूर - ओतूर (ता. जुन्नर) परिसरात मंगळवारी (ता. २३) सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. कोथिंबीर, मेथी, शेपू, टोमॅटो, मिरची, काकडी, कोबी तसेच फुलपिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जास्त पाणी सहन होत नसल्याने पिके कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे.
ओतूर, उदापूर, डिंगोरे, पिंपळगाव जोगा, बल्लाळवाडी, पांगरी माथा, नेतवड, माळवाडी, डुंबरवाडी, खामुंडी, डोमेवाडी, रोहोकडी व इतर परिसरात मुसळधार पाऊस पडला. दिवसभर अधूनमधून सुरू राहिलेल्या पावसामुळे जनजीवनावरही परिणाम झाला. पावसामुळे सोमवारी आनंदित झालेल्या शेतकऱ्यांची मंगळवारी चिंता वाढली.
खरिपास पोषक
पावसाचा जोर कायम राहिल्यास कृषी व महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. पावसामुळे खरीप हंगामासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असले तरी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी मात्र हा पाऊस डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र सध्या ओतूर परिसरात पाहायला मिळत आहे.