कायगाव - गंगापूर तालुक्यातील अगरवाडगावात निर्माण झालेल्या पाणीटंचाईने नागरिक हैराण झाले आहेत. दुष्काळसदृश परिस्थितीत ग्रामस्थांची होणारी परवड पाहून गावातील उच्चशिक्षित युवक सलमान पठाण व मित्रमंडळाने शनिवारी (ता. २०) जून २०२६ पासून पुढाकार घेतला आहे. दररोज २० ते ३० हजार लिटर पाणी टँकरने विकत घेऊन गावातील प्रत्येक वॉर्डात मोफत पुरवठा सुरू केला आहे.
उच्चशिक्षित युवक सलमान पठाण मित्रांसह ‘जलदूत’ बनून धावला आहे. त्यांचे या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे.
२० जूनपासून सलमान पठाण व मित्रमंडळाने स्वतःच्या खिशातून पैसे खर्चून टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे. दररोज सकाळी नऊ व दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान १० हजार लिटर क्षमतेचे टँकर दोन ते तीन खेपा करत गावातील दोन वॉर्डात पाणी पोहोचवत आहेत.
तिसऱ्या वार्डात देखील पाणी पोहचेल.उन्हाच्या तडाख्यात तहानलेल्या ग्रामस्थांसाठी रोज २० ते ३० हजार लिटर पाणी मोफत दिले जात आहे. सलमान पठाण यांच्या या उल्लेखनीय कामाचे ग्रामस्थांनी आभार मानले आहे.
या ‘जलसेवे’त असलम शेख, खालेक भाई, विकास सुखाधन, इरफान शेख, जाबेर पठाण, खासाब पठाण, आसिफ शेख , पंकज सुखधान, राजू खरे,काकासाहेब म्हसरूप,अकिल पठाण खांद्याला खांदा लावून सहकार्य करत आहेत. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थांसह पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.
'पाऊस पडेपर्यंत आणि ग्रामपंचायतचा पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत आमचा उपक्रम अखंड सुरू राहील,' असा निर्धार सलमान पठाणने व्यक्त केला आहे. सलमानसारख्या युवकांचा ‘जलदाता’ अवतार ग्रामीण भागासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
वीज खंडितमुळे पाणीटंचाई
गावच्या सार्वजनिक पाणीपुरवठा पंपाला वारंवार वीज खंडित होत असल्याने टंचाई निर्माण झाली आहे. 'पाणीपुरवठ्याच्या मोटरला सहा तास लाईट आहे, त्यात दोन तास खंडित होते. चार तासांत गावाला पाणी मिळत नाही. विहीर शिवना नदीकाठी आहे, तेथे पाणी आहे, पण सहा तासांपैकी तीन तासच वीज राहते. लोडशेडिंग कमी केले तर समस्या सुटेल,' असे ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामपंचायत प्रशासन पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.
प्रतिक्रिया
'गावकऱ्यांचे पाण्याविना हाल पाहवले नाहीत. १० हजार लिटरचे टँकर भाड्याने लावून रोज २० हजार लिटरच्या वर मोफत पाणी देत आहोत. ही भूतदया आहे, प्रसिद्धीसाठी नाही.'
- सलमान पठाण, टँकरमॅन जलदुत अगरवाडगाव
'वीज समस्येमुळे टंचाई आहे. ग्रामस्थांनी पाणी जपून वापरावे. आम्ही महावितरणकडे पाठपुरावा करत आहोत. अडचण आल्यास थेट संपर्क करा.ग्रामपंचायत उपाययोजना करत आहेत.'
- असलम सय्यद, सरपंच,अगरवाडगाव
पाणी पुरवठा पंपाला वारंवार वीज खंडित होते.परिणामी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासन पाणी टंचाई दूर करण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील आहे.
- निलेश पुराणिक ,ग्रामपंचायत अधिकारी अगरवाडगाव