प्रज्वल रामटेके
पुणे : महाराष्ट्र सरकारच्या वन विभागातर्फे दरवर्षी राबविल्या जाणाऱ्या ‘वनमहोत्सव’ अंतर्गत यंदा राज्यभर व्यापक वृक्षलागवड मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्याने २०२६-२७ या वर्षात अतिरिक्त १० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले असून, त्याअंतर्गत पुणे वनवृत्तात या पावसाळ्यात सुमारे ३० लाख रोपांची लागवड केली जाणार आहे. यासाठी लागणारी सर्व पूर्वतयारी पूर्ण झाली असून, वन विभाग प्रत्यक्ष वृक्षलागवडीसाठी सज्ज असल्याची माहिती पुणे वनवृत्तातर्फे देण्यात आली.
याविषयी विभागीय वन अधिकारी गीता पवार म्हणाल्या, ‘‘पुणे वनवृत्तामध्ये पुणे, जुन्नर आणि सोलापूर या तीन वनविभागांचा समावेश असून ‘अटल आनंदवन घन वन योजने’अंतर्गत या वृक्षलागवडीचे सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. वाढते तापमान, वेगाने होणारे हवामान बदल आणि सातत्याने घटत चाललेले हरित क्षेत्र यांचा गांभीर्याने विचार करून वृक्षलागवडीवर विशेष भर देण्यात येत आहे. यंदा मियावाकी पद्धतीने उच्च घनता वृक्षलागवड, तसेच ‘भरपाई देणारा वनीकरण निधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरण’ (कॅम्पा) योजनेंतर्गत विविध ठिकाणी एकूण २९ लाख ६४ हजार ४९७ रोपांची लागवड केली जाणार आहे. यापैकी २६ लाख १० हजार रोपे मियावाकी पद्धतीने, तर ३ लाख ५३ हजार ८९७ रोपे ‘कॅम्पा’ अंतर्गत लावली जाणार आहेत.’’
पुणे वनविभागातील सासवड, भांबुर्डा, वेल्हे, नसरापूर आणि वडगाव मावळ परिसरात ६८ हेक्टर क्षेत्रावर सुमारे २० लाख ४० हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. याशिवाय ‘कॅम्पा’ योजनेंतर्गत पुणे, बारामती, शिरूर, इंदापूर, दौंड, वडगाव मावळ तसेच सोलापूर जिल्ह्यातील विविध वनपरिक्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली जाणार आहे. लागवडीपूर्व सर्व कामे पूर्ण झाली आहेत. वनमहोत्सवाच्या माध्यमातून केवळ वृक्षलागवडच नव्हे, तर या लावलेल्या रोपांचे संगोपन, संरक्षण आणि पर्यावरणाबाबत समाजात व्यापक जनजागृती करण्यावरही वन विभागाचा भर असणार आहे. ही मोहीम वन विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून राबविली जाणार आहे, असेही वनविभागातर्फे सांगण्यात आले आहे.
‘‘हवामान बदल, वाढते तापमान आणि घटते हरित क्षेत्र ही मोठी आव्हाने आहेत. त्यावर मात करण्यासाठी वृक्षलागवड आणि त्यांचे संगोपन अत्यंत महत्त्वाचे आहे. यंदाच्या वनमहोत्सवासाठी पुणे वनवृत्ताची संपूर्ण पूर्वतयारी झाली आहे. वन विभाग आणि नागरिकांच्या तसेच विविध संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून आपण हरित महाराष्ट्राचे हे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट नक्कीच साध्य करू.’’
- गीता पवार, विभागीय वन अधिकारी, पुणे
दृष्टीक्षेपात वृक्षलागवड मोहीम:
राज्याचे २०२६-२७ मधील उद्दिष्ट : १० कोटी वृक्षलागवड
पुणे वनवृत्तातील एकूण लागवड क्षेत्र : ४०८.१५ हेक्टर
एकूण रोपे : २९,६४,४९७
सद्यस्थिती : लागवडीपूर्व सर्व तयारी पूर्ण
पुणे वनवृत्तातील वृक्षलागवडीची आकडेवारी:
वनविभाग - क्षेत्र (हेक्टर) - रोपे संख्या
पुणे - १८०.०९ - २१,६४,५३१
जुन्नर - ६.०० - ६,६००
सोलापूर - २२२.०६ - ७,९३,३६६
एकूण - ४०८.१५ - २९,६४,४९७