Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार प्रकरणात शिक्षा जाहीर; भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप यावर निर्णय?
esakal June 29, 2026 01:45 AM

पुणे : नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे याला सोमवारी विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. आरोपीला मृत्युदंड की जन्मठेप, याबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे.

विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयाने गुरुवारी कांबळेला भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यातील विविध कलमांखाली दोषी ठरविले. त्यानंतर शिक्षेच्या मुद्यावर सरकार पक्ष, बचाव पक्ष आणि मूळ फिर्यादी यांच्या वतीने स्वतंत्रपणे युक्तिवाद करण्यात आला. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी हा गुन्हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ स्वरूपाचा असल्याचे नमूद करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा दाखला देत आरोपीमध्ये सुधारण्याची शक्यता नसल्याचा दावा केला.

सरकार पक्षाच्या म्हणण्यानुसार, आरोपीने नियोजनपूर्वक चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा खून केला. तपासादरम्यान डीएनए अहवाल, न्यायवैद्यकीय पुरावे, सीसीटीव्ही चित्रीकरण, परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. मुलीच्या शरीरावर १८ गंभीर जखमा आढळून आल्याचेही तपासातून स्पष्ट झाले होते.

दुसरीकडे, बचाव पक्षाने पोलिसांनी सादर केलेले पुरावे परिस्थितीजन्य असल्याचा दावा करत हा गुन्हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ प्रकारात मोडत नसल्याचे न्यायालयात मांडले. आरोपीविरुद्धची पुराव्यांची साखळी पूर्णपणे सिद्ध झालेली नसल्याचा युक्तिवादही बचाव पक्षाने केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.