Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर
esakal June 29, 2026 01:45 AM

सध्या मॉन्सूनचा विदर्भासह संपूर्ण मध्य भारतावर तीव्र प्रभाव असल्यामुळे या आठवड्यात पावसाचा जोर वाढणार आहे. प्रादेशिक हवामान विभागाने सोमवारपासून (ता. २९) अकराही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला असून, काही ठिकाणी मुसळधार किंवा अतिवृष्टीचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.

विदर्भात २३ जूनला मॉन्सूनचे धडाक्यात आगमन झाल्यापासून जवळपास रोजच कुठे ना कुठे पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. मात्र जशी अपेक्षा होती, तसा दमदार पाऊस अद्यापही बरसला नाही. नागपूरकरही गेल्या अनेक दिवसांपासून धो-धो पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आता मात्र जोरदार पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे.

Monsoon Rain : मॉन्सूनचा वेग मंदावला, सहा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट; राज्यात हवामान अंदाज कसा असेल

अरबी समुद्रासोबतच बंगालच्या उपसागराकडूनही वारे येत असल्यामुळे या आठवड्यात विदर्भात सगळीकडेच विजांसह दमदार पावसाची दाट शक्यता आहे. हवामान विभागासोबतच खासगी संकेतस्थळानेही तशी शक्यता वर्तविली आहे. विदर्भात जवळपास आठवडाभर पावसाळी वातावरण राहणार आहे. यंदाच्या पावसाळ्यातील पहिला जून महिना संपत आला असून, लवकरच जुलै सुरू होत आहे.

जुलैमध्ये सुरुवातीपासूनच दमदार पाऊस असल्याचे बोलले जात आहे. नागपूरसह काही ठिकाणी मुसळधार तसेच अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे जूनचा विचार केल्यास, या महिन्यात नागपुरात आतापर्यंत केवळ ११६.५ मिलीमिटर पाऊस पडला आहे, जो सरासरीच्या (१९० मिमी) ४० टक्के कमी आहे. विदर्भात हे प्रमाण आणखीनच कमी आहे. पुरेशा पावसाअभावी साहजिकच पेरण्यादेखील खोळंबल्या आहेत. त्यामुळे आगामी दिवसांत पेरण्यांना तर वेग येईलच, शिवाय पावसाची तूटही भरून निघणार आहे.

Monsoon Alert: मुंबईत ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा २४ वेळा धडकणार! सर्वात मोठी भरती कधी येणार? मान्सूनसोबत हाय टाइडचाही धोका

नागपूर शहरात दिवसा ऊन तापत आहे. सायंकाळ होताच ढगांची दाटी होते. रविवारीही जवळपास असेच वातावरण होते. हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट असूनही पावसाचा थेंबही पडला नाही. उन्हामुळे दिवसभर उकाडा जाणवला. मात्र सायंकाळच्या सुमारास ढगांमुळे पारा अंशतः घसरून वातावरण आल्हाददायक बनले होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.