ओमराजे निंबाळकरांना घरातच धक्का, कुटुंबातील मोठ्या व्यक्तीने घेतली उद्धव ठाकरेंची भेट; धाराशिवमध्ये मोठा गेम होणार?
Tv9 Marathi June 29, 2026 01:45 AM

शिवसेना ठाकरे गटात काही दिवसांपूर्वी मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं. 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली. या सर्व खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का आहे. ज्या खासदारांनी बंडखोरी केली, त्यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा देखील समावेश आहे. दरम्यान आजच ओमराजे यांचा मतदारसंघ असलेल्या धाराशिव मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली, या सभेत बोलताना त्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर  आली आहे, ती म्हणजे ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का बसला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांचे काका केशव (बाबा) पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाला पाठिंबा दिला आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर यांचे काका केशव (बाबा) पाटील यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.  ओमराजे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता त्यांचे काका बाबा पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे.  बाबा पाटील हे  धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत तसेच ते भूविकास बँकेंचे माजी चेअरमन देखील आहेत. घरातीलच व्यक्तीने शिवसेना ठाकरे गटाला पाठिंबा दिल्यामुळे आता हा ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

उद्धव ठाकरेंची सभा 

दरम्यान खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर आता उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे, ज्या -ज्या मतदारसंघात बंडखोरी झाली, त्या -त्या मतदारसंघात उद्धव ठाकरे सभा घेत आहेत. आज उद्धव ठाकरे यांनी ओमराजे यांचा मतदारसंघ असलेल्या धाराशिवमध्ये सभा घेतली, यावेळी बोलताना त्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ओमराजे हा गद्दारीचा डाग कसा पुसणार असा सवाल यावेळी ठाकरे यांनी केला आहे.

‘जेव्हा मी खासदारांची बैठक बोलावली होती, तेव्हाच मला यांनी न येण्याची वेगवेगळी कारणं दिली होती. तेव्हा मी यांना म्हटलो नका येऊ. मात्र जेव्हा यांचे चेहरे मला व्हिडीओमध्ये दिसायला लागले, तेव्हा मी ओमराजे निंबाळकरांना विचारलं, तुमचा चेहरा बरोबर दिसत नाहीये. तुमच्यावर काही तणाव आहे का? तेव्हा ते म्हणाले नाही माझं सगळं बरोबर आहे, मी ठीक आहे, तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती, असंही यावेळी ठाकरे यांनी म्हटलं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.