तुम्ही अनेकदा ऐकले असेल की, जगात प्रत्येक व्यक्तीसारखे दिसणारे सात लोक असतात. शतकानुशतके हे वाक्य प्रचलित झालेले आहे. मात्र आता या दाव्यावर वैज्ञानिकांनी संशोधन केले असून यातून सत्य समोर आले आहे. संशोधकांच्या मते, अनोळखी व्यक्ती एकमेकांसारख्या दिसू शकतात, पण दोन व्यक्तींचा चेहरा 100 टक्के एकसारखा असण्याची शक्यता अत्यंत कमी असते. या दाव्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
एकसारखे दिसणारे 7 लोक असतात?जगातील प्रत्येक व्यक्तीचे सात हमशक्ल असतात असं बोलले जाते, मात्र याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. हा दावा लोककथांद्यारे प्रचलित झाला आहे. ॲडलेड विद्यापीठाच्या संशोधकांनी चेहऱ्याच्या अनेक महत्त्वाच्या मोजमापांचे विश्लेषण केले. त्यानुसार, दोन अनोळखी व्यक्तींच्या चेहऱ्यातील सर्व प्रमुख वैशिष्ट्ये पूर्णपणे जुळण्याची शक्यता सुमारे 1 ट्रिलियनपैकी 1 इतकी आहे. जगाची लोकसंख्या सुमारे 8 अब्ज असल्यामुळे असा तंतोतंत चेहरा जुळण्याची शक्यता जवळपास अशक्य मानली जाते.
अनेकांचा डीएनए एकसारखा…माणूस हा चेहऱ्याच्या अचूक मोजमापांवरून नव्हे, तर त्याच्या एकूण दिसण्यावरून ओळखतो. दोन लोकांच्या चेहऱ्याची रचना वेगळी असली तर, एकसारखी हेअरस्टाईल, दाढी-मिशा, डोळ्यांचा रंग किंवा चेहऱ्यावरील हावभाव यामुळे दोन अनोळखी व्यक्ती जवळपास सारख्या दिसू शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे मानवी डीएनएपैकी सुमारे 99.9 टक्के डीएनए समान असतो. मात्र, चेहऱ्याचे स्वरूप केवळ त्यातील एका छोट्या आनुवंशिक भागावर अवलंबून असते.
अनेकांच्या चेहऱ्यात साम्य…अब्जावधी लोकांमध्ये अनेक आनुवंशिक गुणधर्म समान असल्यामुळे कोणताही जैविक संबंध नसतानाही काही व्यक्तींचे चेहरे बऱ्याच प्रमाणात सारखे दिसू शकतात. वैज्ञानिक संशोधनात अशा काही अनोळखी व्यक्ती आढळल्या आहेत, ज्यांच्या चेहऱ्यात मोठ्या प्रमाणात साम्य आहे. अशा व्यक्तींना कधी-कधी ट्विन स्ट्रेंजर्स असे म्हटले जाते. त्यांच्या चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांवर परिणाम करणारे काही आनुवंशिक नमुने एकसारखे असू शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे सात हमशक्ल असतात, या दाव्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. हा समज प्राचीन लोककथा, पारंपरिक गोष्टी यातून समोर आलेला आहे.