राज्यभरात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून, अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे रस्ते, रेल्वे आणि सार्वजनिक वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. त्याचबरोबर मुंबई–पुणे रेल्वेमार्गावरही दरड कोसळल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून, कर्जत–खोपोली दरम्यान रेल्वे रुळांखालचा खडीचा थर वाहून गेल्यामुळे त्या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगरांमध्येही अनेक दुर्घटना घडत आहेत. विविध ठिकाणी झाडे आणि झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना समोर येत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर अनेक विद्यार्थी जखमी झाले होते.
अशातच, मुंबईतील जुहू परिसरातही मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे जुहूतील एन. एस. रोडवर अभिनेते धर्मेंद्र यांच्या निवासस्थानाजवळ एका मोठ्या झाडाची फांदी अचानक कोसळली. या ठिकाणाजवळच अभिनेते अजय देवगण यांचेही निवासस्थान आहे.
सुदैवाने, फांदी कोसळली त्यावेळी त्या ठिकाणी कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. मात्र, ही फांदी बराच वेळ रस्त्यावर पडून असूनही ती हटवण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
या घटनेमुळे नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली असून, संभाव्य अपघात टाळण्यासाठी कोसळलेल्या फांद्या आणि धोकादायक झाडे तातडीने हटवावीत, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस मुंबईसह कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला असून, नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.