अमरावतीत पुन्हा बिबट्याची दहशत, पीडीएमसी परिसरात दिसल्या पाऊलखुणा, वनविभागाकडून शोधमोहीम
esakal July 08, 2026 12:45 AM

अमरावतीतील वर्दळीच्या आणि रुग्णांसह विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. परिसरात बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्याने महाविद्यालय प्रशासनासह रुग्ण, नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून वनविभागालाही याची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंचवटी चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी तसेच ऑडिटोरियम परिसरात बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्या आहे. या खुणांची पाहणी केल्यानंतर परिसरात बिबट्याचा मुक्त वावर असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.

Amravati Crime : पतीनेच नातेवाईकासोबत संबंध ठेवायला लावले, अत्याचारानंतर मारहाण; पत्नीचे गंभीर आरोप

महाविद्यालय प्रशासनाने रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक, विद्यार्थी तसेच कर्मचारी यांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. रात्रीच्या वेळी परिसरात एकट्याने फिरणे टाळावे, अत्यावश्यक असल्यास गटानेच बाहेर पडावे, अंधाऱ्या ठिकाणी जाताना मोबाईलचा टॉर्च किंवा इतर प्रकाशाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच बिबट्याच्या हालचाली दिसल्यास तातडीने सुरक्षा विभाग, महाविद्यालय प्रशासन किंवा वनविभागाशी संपर्क साधावा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Amravati: धारणीत शेतकरी दाम्पत्यासह दोन बैलांचा मृत्यू; जीर्ण वीज खांब ठरला जीवघेणा; भोकरबर्डी येथील घटना

दरम्यान, वनविभागाकडून परिसराची पाहणी केली जाणार असून बिबट्याचा नेमका वावर कोणत्या भागात आहे, याचा शोध घेतला जाणार आहे. आवश्यक असल्यास पिंजरे लावणे, गस्त वाढवणे आणि नागरिकांना सतर्क ठेवण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तोपर्यंत नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.