Mahabaleshwar Landslide: 'पुस्तकांचे गाव' भिलारवर पुन्हा निसर्गाचा घाला; जमीन ७ फूट खचली, घरे-शेतीवर संकटाचे सावट, जुन्या आठवणी ताज्या..
esakal July 10, 2026 08:45 AM

भिलार: ‘पुस्तकांचे गाव’ भिलार (ता. महाबळेश्वर) गावावर पुन्हा एकदा निसर्गाच्या अवकृपेचे गडद सावट निर्माण झाले आहे. संततधार पावसाने भिलार परिसराला झोडपून काढल्‍याने जमिनीतील ओलावा कमालीचा वाढला. त्‍यातून जुने गावठाण परिसरातील जमीन तब्बल पाच ते सात फूट खोल खाली खचल्याचे निदर्शनास आले, तर धनगरवाडी (बोंडारवाडी) येथील सर्व्हे क्रमांक २/२७ मधील शेतजमीन मोठ्या प्रमाणावर खचल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

​भिलार येथील जुने गावठाण भागातील राम मंदिर परिसर हा भौगोलिकदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. याच परिसरातील सावित्राबाई कांबळे यांच्या मालकीची जमीन मुसळधार पावसामुळे अचानक पाच ते सात फूट खाली खचली. जमीन खचल्यामुळे केवळ त्याच जागेला नव्हे, तर आजूबाजूला हाकेच्या अंतरावर असणाऱ्या अनेक लोकवस्त्या, घरे आणि शेतीलाही मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

महाबळेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय विभूते यांनी तत्काळ आपत्तीग्रस्त घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) सुनील चिकणे, रमेश ओव्हाळ, ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र चव्हाण, सरपंच शिवाजी भिलारे, जिल्हा नियोजन कमिटी सदस्य प्रवीण भिलारे, पोलिस पाटील रूपाली कांबळे, तसेच विश्वनाथ भिलारे, अमोल भिलारे, विनायक भिलारे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

दगडी बांध कोसळला

महाबळेश्वर तालुक्यात गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर भूस्खलन व शेतीचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील धनगरवाडी (बोंडारवाडी) येथील सर्व्हे क्रमांक २/२७ मधील शेतजमीन मोठ्या प्रमाणावर खचल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

या जमिनीचे मालक दगडू ठकू आखाडे, धोंडू ठकू आखाडे आणि सूर्यकांत गौरू आखाडे यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. शेतातील संपूर्ण बोअरवेल जमीन सरकून खोल दरीत कोसळली आहे. विशेष म्हणजे, सुमारे ५०० फूट दगडी बांध कोसळला असून बांधालगतची सुमारे २० फूट रुंदीची जमीनही पूर्णपणे खचली आहे.

या दुर्घटनेमुळे स्ट्रॉबेरी लागवडीसाठी तयार केलेले प्लॉट पूर्णपणे नष्ट झाले आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात शेती करणे जवळपास अशक्य झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अनेक वर्षांच्या मेहनतीने उभारलेली शेती काही तासांत उद्ध्वस्त झाल्याने संबंधित कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सचिन मस्के यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त क्षेत्राचा पंचनामा करण्यात आला असून, शासनाकडे अहवाल सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Nagpur Pune Vande Bharat: प्रवाशांसाठी खुशखबर! नागपूर–पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला मिळणार नवीन १६/२० डब्यांचा रेक; विदर्भ–पश्चिम महाराष्ट्र प्रवास होणार सोयीचा आठवणी ताज्या

भिलारमधील या घटनेमुळे ग्रामस्थांच्या मनात १ जुलै २००५ मध्‍ये घडलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. त्या वर्षी झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे जुन्या गावठाण परिसरात खचलेल्‍या जमिनीमुळे जवळपास ३५ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. अवाढव्य झाडे मुळासकट उन्मळून पडली होती. अनेक कुटुंबांना आपले हक्काचे घर सोडून बेघर व्हावे लागले होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.