Mahabaleshwar Murder: पुण्यातील पर्यटकाची महाबळेश्वरमध्ये निर्घृण हत्या; मुक्कामाच्या हॉटेलबाहेर घडली थरारक घटना, चौघे ताब्यात, धक्कादायक कारण..
esakal July 10, 2026 09:45 AM

​पाचगणी : महाबळेश्वर-​पाचगणी परिसरातील भोसे गावात भिगवण (जि. पुणे) येथून पर्यटनासाठी आलेल्या २५ वर्षीय पर्यटकास स्थानिक चौघांनी मिळून बेदम मारहाण केली. त्‍यात त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याने पोलिसांनी खुनाचा गुन्‍हा दाखल करत, सर्व संशयितांना ताब्‍यात घेतले आहे. अक्षय रमेश जाधव (रा. भिगवण, ता. इंदापूर) असे मृत पर्यटकाचे नाव असून, आपल्या घराच्या दिशेने डोकावल्याचा संशय आल्याच्या कारणावरून ही घटना घडली.

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

याप्रकरणी पाचगणी पोलिसांनी झिरो नंबरने दाखल झालेल्‍या गुन्ह्याप्रकरणी तत्काळ कारवाई करत सूर्यकांत चंद्रकांत गोळे (रा. भोसे, ता. महाबळेश्वर), अविनाश सतीश भोसले (रा. बावधन, ता. वाई), राहुल जनार्दन राजपुरे (रा. कनुर, ता. वाई) आणि अमोल गणेदेव वाडकर (रा. चिखली, ता. वाई) या चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

​याबाबत पाचगणी पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, की इंदापूर तालुक्यातून फिर्यादी विशाल अजित जाधव आणि त्यांचा मित्र अक्षय जाधव हे इतर काही मित्रमंडळींसह महाबळेश्वर व पाचगणी परिसरात पर्यटनासाठी आले होते. ते भोसे गावच्या हद्दीतील ‘अतिथी व्हिला हॉटेल अँड लॉज’ येथे मुक्कामास होते. बुधवारी (ता. ८) रात्रीच्या सुमारास फिर्यादी, मृत अक्षय आणि त्यांच्या मित्रांनी हॉटेलमध्ये मद्यप्राशन केले होते.

यामध्ये अक्षयने जास्त प्रमाणात मद्य घेतल्‍याने मित्रांनी त्याला सुरक्षिततेच्या दृष्टीने खोलीत झोपवले आणि बाहेरून खोलीला कडी लावून ते स्वतः हॉटेलच्या टेरेसवर गप्पा मारत बसले. मात्र, काही वेळाने मित्र जेव्हा खोलीत परतले, तेव्हा त्यांना अक्षय खोलीमध्ये दिसून आला नाही. तो खोलीतून बाहेर कसा पडला, याचा शोध घेत मित्र खाली आले असता, त्यांना हॉटेलपासून सुमारे २०० मीटर अंतरावर लोकांची गर्दी आणि बॅटरीचा उजेड चमकताना दिसला.

​मित्रांनी तातडीने त्या दिशेने धाव घेऊन पाहिले असता, तेथील धक्कादायक दृश्य पाहून त्यांचे काळीज सुन्न झाले. काही स्‍थानिक व्यक्ती अक्षयला लाकडी काठ्या, दगड आणि हाताबुक्यांनी अत्यंत अमानुषपणे बेदम मारहाण करत होते. संशयिताच्‍या घरात डोकावल्याच्या संशयातून संतापलेल्या स्थानिकांनी अक्षयवर हा जीवघेणा हल्ला चढवला होता. या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला. मित्रांनी त्याला तत्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी पाचगणी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले.

Nagpur Pune Vande Bharat: प्रवाशांसाठी खुशखबर! नागपूर–पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला मिळणार नवीन १६/२० डब्यांचा रेक; विदर्भ–पश्चिम महाराष्ट्र प्रवास होणार सोयीचा

मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी वाई आणि नंतर बारामती येथील डॉ. बोके रुग्णालयात हलवण्यात आले; परंतु तेथील डॉक्टरांनी तपासणी करून अक्षयला मृत घोषित केले. ​वाईचे पोलिस उपअधीक्षक श्री. साळुंखे आणि पाचगणी पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. जी. पवार यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.