उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध दुधवा राष्ट्रीय उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आता प्रवास अधिक आरामदायी, सुरक्षित आणि परवडणारा होणार आहे. पूर्वोत्तर रेल्वेच्या लखनौ विभागाने मैलानी–बिछिया–मैलानी मार्गावर विशेष एमजी टुरिस्ट एसी चेअरकार रेल्वेगाडी सुरू केली आहे. या सेवेमुळे पर्यटकांना दुधवा राष्ट्रीय उद्यानातील घनदाट जंगल आणि वन्यजीवांचा आनंद अधिक सोयीने घेता येणार आहे. या विशेष रेल्वेसेवेचे आरक्षण आयआरसीटीसीमार्फत उपलब्ध आहे.
असे आहे रेल्वेगाडीचे वेळापत्रक
पूर्वोत्तर रेल्वेच्या लखनौ विभागाचे जनसंपर्क अधिकारी महेश कुमार गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५२२६० क्रमांकाची मैलानी–बिछिया रेल्वेगाडी आठवड्यातील शनिवार आणि रविवारी धावणार आहे.
ही रेल्वेगाडी सकाळी ६.०५ वाजता मैलानी जंक्शनवरून सुटेल. भीराखेरी, पलिया कलां, दुधवा, बेलरायां, तिकुनिया, खैरतिया बांध रोड हाल्ट आणि मंझरा पुरब या स्थानकांवर थांबत ती सकाळी १०.३० वाजता बिछिया येथे पोहोचेल.
परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी सकाळी ११.४५ वाजता बिछियावरून सुटून त्याच मार्गाने सायंकाळी ४.१० वाजता मैलानी जंक्शनला पोहोचेल.
अवघ्या २७० रुपयांत आरामदायी प्रवास
पर्यटकांच्या सोयीसाठी या रेल्वेगाडीत ६० आसनांची वातानुकूलित टुरिस्ट चेअरकार जोडण्यात आली आहे.
मैलानी ते बिछिया या संपूर्ण प्रवासासाठी प्रति प्रवासी २७० रुपये इतके भाडे निश्चित करण्यात आले आहे.
या रेल्वेगाडीचे तिकीट प्रवासी आरक्षण केंद्रातून तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन आरक्षित करता येणार आहे.
पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना
दुधवा राष्ट्रीय उद्यानात पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन विभागाने यापूर्वीच उत्तर प्रदेश राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने लखनौतील कैसरबाग बसस्थानकातून थेट वातानुकूलित बस सेवा सुरू केली आहे.
View this post on Instagram
आता या बस सेवेबरोबरच विशेष एसी चेअरकार रेल्वेगाडी उपलब्ध झाल्यामुळे लखनौ आणि आसपासच्या भागातील पर्यटकांना दुधवा राष्ट्रीय उद्यानापर्यंत पोहोचणे अधिक सुलभ झाले असून, राज्यातील पर्यटनालाही त्याचा मोठा लाभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.