30 सेकंदांत 195 Kiss ! कपलचा खतरनाक रेकॉर्ड, डायरेक्ट गिनीज बूकमध्ये एंट्री
Tv9 Marathi July 11, 2026 03:45 PM

एखादं कपल किंवा जोडपं अवघ्या 30 सेकंदात शेकडो वेळा किस करू शकतं का ? ऐकायला हे विचित्र वाटू शकतं पण ब्राझीलमधल्या एका जोडप्याने हे खरंच करून दाखवलंय. ब्राझीलमधील एका डॉक्टर कपलने अनोखी कामगिरी करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. रेनाटो बायमा गैया आणि त्यांची जोडीदार नायारा रोबर्टा रिबेरो डी मारिन्स यांनी अवघ्या 30 सेकंदांत 195 वेळा किस करून सर्वाधिक किस करण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या माहितीनुसार, या जोडप्याने ही कामगिरी इंटरनॅशनल किसिंग डेच्या दिवशी केली. हा दिवस दरवर्षी 6 जुलै रोजी साजरा केला जातो. याला वर्ल्ड किस डे असेही म्हटले जाते. या दिवसाची सुरुवात युनायटेड किंगडममध्ये झाली आणि नंतर जगातील अनेक देशांमध्ये तो साजरा केला जाऊ लागला.

डॉक्टर असूनही अनोखी आव्हानात्मक कामगिरी

रेनाटो बायमा गैया आणि नायारा रोबर्टा रिबेरो डी मारिन्स हे दोघेही व्यवसायाने डॉक्टर आहेत. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी फ्रंटलाइन वर्कर म्हणून रुग्णांची सेवाही केली होती. वैद्यकीय क्षेत्रात काम करत असतानाच त्यांनी ही अनोखी कामगिरी करून जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

दीड वर्षांपासून एकत्र

32 वर्षीय रेनाटो आणि 33 वर्षीय नायारा गेल्या सुमारे दीड वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनी मिळून हा विक्रम करण्याचा निर्णय घेतला. त्यांना वाटत होते की, त्यांची जोडी ही या आव्हानासाठी योग्य आहे आणि त्यांनी ते यशस्वीपणे पूर्ण करून दाखवले.

रेनाटो यांचा याआधीही विक्रमांचा इतिहास

रेनाटो बायमा गैया यांच्यासाठी हा पहिलाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नाही. याआधीही त्यांनी अनेक विक्रम केले आहेत. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, 10 पुस्तकांना सर्वात वेगाने रचून पाडण्याचा आणि पुरुष गटात सर्वाधिक वेळा पाय फिरवण्यासारखे विक्रम त्यांच्या नावावर आहेत.

रेनाटो यांनी सांगितले की, आता त्यांना वाटते की ते सर्वाधिक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड असलेल्या ब्राझीलमधील व्यक्तींपैकी एक झाले आहेत. मात्र, यावेळी त्यांच्यासाठी सर्वात खास गोष्ट म्हणजे या विक्रमात त्यांच्या जोडीदार नायाराचे नावही सहभागी झाले आहे.

आता पुढचं लक्ष्य 1 मिनिटाचा विक्रम

30 सेकंदांत 195 किसचा विक्रम केल्यानंतर या जोडप्याने आता आणखी मोठे लक्ष्य ठेवले आहे. 1 मिनिटात सर्वाधिक किस करण्याचा विक्रम मोडण्याची त्यांची तयारी सुरू आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.