Netflix Film Trending:वीकेंडला एखादा दमदार चित्रपट पाहायचा विचार करत असाल, तर नेटफ्लिक्सवर नुकताच प्रदर्शित झालेला एक स्पोर्ट्स-ॲक्शन ड्रामा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवरही प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. विशेष म्हणजे, रिलीज झाल्यानंतर अवघ्या 24 तासांतच या चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या टॉप ट्रेंडिंग यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे. (Netflix Action Thriller)
दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'पेड्डी' हा स्पोर्ट्स-ॲक्शन ड्रामा 4 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. जवळपास 3 तास 7 मिनिटे कालावधी असलेल्या या चित्रपटात ॲक्शन, स्पोर्ट्स, ड्रामा आणि राजकारणाचा थ्रील पाहायला मिळतो.चित्रपटात राम चरण, जान्हवी कपूर, दिव्येंदू शर्मा, शिव राजकुमार, जगपती बाबू आणि बोमन इराणी यांसारख्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.
'पेड्डी'ने प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. विशेषतः तेलुगू प्रेक्षकांकडून या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला. जगभरात या चित्रपटाने 333 कोटी रुपयांच्या आसपास कमाई केली. हिंदीत अपेक्षेइतका प्रतिसाद मिळाला नसला, तरी परदेशात चित्रपटाने चांगली कमाई केली. त्यामुळे हा चित्रपट यशस्वी ठरला.
चित्रपटाची कथा एका छोट्या गावात राहणाऱ्या मजुराभोवती फिरते. तो दिवसभर मजुरी करतो, पण त्याच्याकडे क्रिकेट आणि कुस्ती या दोन्ही खेळांचं अफाट कौशल्य असतं. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर तो केवळ स्वतःचं आयुष्य बदलण्याचा प्रयत्न करत नाही, तर आपल्या गावालाही अधिकृत ओळख आणि रेल्वे स्टेशन मिळवून देण्यासाठी भ्रष्ट राजकारणाविरोधात लढा उभा करतो.स्पोर्ट्स, संघर्ष, भावना आणि प्रेरणा यांचा सुंदर संगम या चित्रपटात पाहायला मिळतो.
'पेड्डी' हा चित्रपट 9 जुलैपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे. ओटीटीवर प्रदर्शित होताच त्याने नेटफ्लिक्सच्या टॉप 10 ट्रेंडिंग यादीत अवघ्या एका दिवसात पहिलं स्थान मिळवलं. त्यामुळे वीकेंडला दमदार स्पोर्ट्स-ड्रामा पाहायचा असेल, तर 'पेड्डी' नक्की पाहू शकता.