Nagpur Crime News : नागपूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तुरुंगातून पैरोलवर आलेल्या एकाने नागपूर जिल्ह्यातील फुकेश्वर (Fukeshwar Robbery) भागात चाकूचा धाक दाखवत एका कुटुंबाला लुटले. मात्र काही दिवसांनी शोध घेत पोलीस घरापर्यंत पोहोचल्यानंतर या धूर्त गुन्हेगाराने पेरोल संपण्यापूर्वीच अमरावती तुरुंगात जाऊन स्वतःला तुरुंगात जमाही करून घेतले. मात्र, पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान करत आरोपीचा शोध घेतला आणि अखेर बिंग फुटलच. मात्र 'तो मी नव्हेच' चा हा प्रयत्न फसलाय. (Nagpur Fukeshwar Robbery Update)
Nagpur Crime News : मुलीने मोबाईलमध्ये चित्रित केलीली लुटीची संपूर्ण घटना ठरली महत्वाची
नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी पोलीस स्टेशन अंतर्गत फुकेश्वर शिवारात 5 जुलैच्या संध्याकाळी झालेल्या लुटीच्या घटनेमध्ये दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे लुटीच्या या घटनेतील प्रमुख आरोपी अफरोज उर्फ भाईजान पठाण हा अमरावती तुरुंगातून पेरोलवर बाहेर आला होता. पेरोलवर असताना त्याने आणखी एका गुन्हेगाराच्या मदतीने 5 जुलै रोजी फूकेश्वर भागात कृषी विभागाचे कर्मचारी सुहास हजारे यांना चाकूचा धाक दाखवत लुटले होते. घटनेच्या वेळेला सुहास हजारे यांचे कुटुंबीय ही कारमध्ये होते. मात्र मागच्या सीटवर बसलेल्या त्यांच्या मुलीने लुटीची संपूर्ण घटना मोबाईलमध्ये चित्रित केली होती.
Fukeshwar Robbery : घटनास्थळापासून 25 किलोमीटरच्या संपूर्ण परिसरातील प्रत्येक सीसीटीव्ही फुटेज तपासले.
दरम्यान, मोबाईल फुटेजमध्ये दिसत असलेल्या चेहऱ्यांचा शोध घेत पोलिसांनी घटनास्थळापासून 25 किलोमीटरच्या संपूर्ण परिसरातील प्रत्येक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याच्या आधारावर पोलीस अफरोज उर्फ भाईजान पठांच्या घरापर्यंत जाऊन पोहोचले. धक्कादायक बाब म्हणजे आपल्या घरापर्यंत पोलीस पोहोचले आहे याची माहिती मिळताच अफरोज पठाण 11 जुलैच्या रात्री (10 आणि 11 जुलैची मध्यरात्र) अमरावती तुरुंगात जाऊन मी पेरोलवरून परत आलो, माझे काम संपले, आता मला तुरुंगात घ्या, असे स्वतःहून सांगून तुरुंगात जमा झाला. तुरुंग अधिकाऱ्यांना अफरोजने बाहेर काय प्रताप केले आहे याची माहिती नसल्यामुळे त्यांनी त्याला तुरुंगात जमा करून घेतले. आता नागपूर पोलिसांनी अमरावती तुरुंगातून अफरोजला लुटीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यासाठी अर्ज दिले आहे. लवकरच त्याला विशेष परवानगीने अमरावती तुरुंगातून तपासासाठी अटक करून नागपुरात आणले जाईल, अशी माहिती आहे.
रस्ता विचारणे पडले महाग, 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? (Nagpur Fukeshwar Robbery Update)
नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुषांत हजारे हे आपल्या कुटुंबासह कारने प्रवास करत होते. रस्ता चुकल्याने त्यांनी एका दुचाकीस्वाराकडे मार्ग विचारला. काही अंतरापर्यंत रस्ता दाखवल्यानंतर आरोपीने आपल्या साथीदारासह कारचा पाठलाग केला, गाडी अडवली आणि चाकूचा धाक दाखवत पतीच्या गळ्यातील सोन्याची चेन व पत्नीचे मंगळसूत्र अशा सुमारे ₹1.26 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारत घटनास्थळावरून फरार झाला. विशेष म्हणजे, संपूर्ण घटना मुलीने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली असून त्यात आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत आहे.