नवलच – शहरे किती ‘बुडीतखाती?’
Marathi July 26, 2026 03:25 PM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

>> अरुण

आज 26 जुलै, 21 वर्षांपूर्वी मुंबई आणि परिसरात पावसाने कहर केला. 24 तासांत तब्बल 944 मिलीमीटर किंवा 37 इंच पाऊस पडला. मुंबई आणि आसपासच्या परिसरात महापूर आला. कधी नव्हे ते दादरसारख्या भागातही घरात पाणी भरलं. अनेकांचा बळी गेला. लाखो रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं. आभाळ भरून आलं होतं, परंतु महाराष्ट्राला जुलैमधलं हे दृश्य अनोखं नव्हतं. या महिन्यात पावसाचा जोर वाढतो हे ठाऊक होतं. मात्र या वेळी मुंबईकरांनी कदाचित शतकामधला महापूर अनुभवला. मुंबईतील ‘मिठी’ नदीचा शोध मुंबईकरांना नव्याने लागला. त्यापूर्वी 1975 मध्ये मुंबईत 22 इंच पाऊस झाला होता, परंतु सारं शहरच बुडीतखाती गेलं नव्हतं. 2005 पासून मात्र ‘26 जुलै’चा पूर हा एक वाक्प्रचारच झाला आहे.
हे झालं एखाद्या शहराचं तात्पुरतं पाण्याखाली जाणं, परंतु ग्लोबल वार्मिंगचा ‘स्लो पायझनिंग’सारखा जो परिणाम होतोय त्यामुळे किती शहरे जगात पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे याची पाहणी झालीय. यातली बरीच शहरं समुद्रकिनारी किंवा नदीकाठी आहेत.

सागरकिनारी असलेली शहरं ही मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय जल-व्यापारासाठी उभारली गेली. विशाल बंदर-बांधणीतून या शहरांमधला व्यापार उदीम वाढला. मग वस्ती दाटली. इतकी की त्या त्या शहरांचा असह्य भार झाली. आपली मुंबई त्यातलंच एक शहर. त्यातच ग्लोबल वार्मिंगमुळे समुद्रांची पातळी वर्षाकाठी अर्ध्या सेंटीमीटरने जरी वाढली तरी पुढच्या पन्नास वर्षांत ती 25 सेंटीमीटर म्हणजे जवळ जवळ फूटभर वाढेल. साहजिकच समुद्रसपाटीचे भाग पाण्याखाली जातील. किनारी वस्त्यांना हा धोका अधिक. 1880 पासून आतापर्यंत जागतिक सागरपातळी 8 ते 9 इंचांनी वाढली आहे.

परिणाम? एकच! 2050 पर्यंत फूटभर वाढलेला समुद्राने आशिया आणि उत्तर अमेरिकेतल्या शहरांवर समुद्राचं आक्रमण लवकर होईल असं म्हटलं जातं. यामध्ये इंडोनेशियाची राजधानी जकार्ता, थायलँडची राजधानी बँकाँक, व्हिएतनामचं हो. चि. मिन्ह शहर आणि इटलीमधल्या व्हेनिस या इतिहास प्रसिद्ध शहरांचा समावेश आहे. हिंदुस्थानातील 7500 किलोमीटरच्या सागरकिनाऱयावरच्या शहरांना धास्ती आहे, पण धोका एवढय़ातच नाही. अर्थात म्हणून गाफील राहूनही चालणार नाही. कारण जकार्ता मात्र दरवर्षी 6 ते 10 इंच खचतय. मुळातच ते 40 टक्के सागरपातळीखाली वसलंय. त्याचं भवितव्य ‘बुडीतखाती’ जाईल का?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.