‘तुकाराम’ हे पुस्तक वरिष्ठ सनदी अधिकारी व सध्या राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त असलेले तुकाराम मुंढे यांच्या जीवन प्रवासावर आधारित आहे. या धडाकेबाज अधिकाऱ्याचा संपूर्ण प्रशासकीय प्रवास कायम संघर्षाच्या वाटेनेच झाला. बालपण ते आयएएस होईपर्यंत ते अभावानेच जीवन जगले. आयएएस स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचा हा प्रवास फारच प्रेरणादायी ठरणार आहे.
आयएएस झाल्यावर पारदर्शक प्रशासनाच्या आग्रहामुळे त्यांची 20 वर्षात तब्बल 25 वेळा बदली करण्यात आली. त्यांच्या याच संघर्षमय आयुष्याचा वस्तुनिष्ठ आढावा ‘तुकाराम’ या पुस्तकात घेण्यात आला आहे. मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरेल, इतके हे पुस्तक गुणात्मकदृष्ट्या उत्तम झाले आहे. ‘तुकाराम’ या पुस्तकाचे लेखक शफी पठाण हे मराठीचे अभ्यासक व नामवंत पत्रकार आहेत. मागच्या 25 वर्षांपासून ते माध्यमात कार्यरत आहेत. या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्या लिखाणाने आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राच्या मनाचा ठाव घेतला आहे.





