Ambernath News : अंबरनाथमध्ये शासनाच्या जमिनीवरील 2011 पूर्वीची सर्व अनधिकृत घरं आता अधिकृत होणार आहेत. याबाबत राज्य शासनाने जीआर (GR) काढल्याची माहिती अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर (Balaji Kinikar) यांनी दिलीये. अंबरनाथ शहरात (Ambernath News) महसूल, वनविभाग यांच्या जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं आहेत. पूर्वीच्या काळी लोकांनी मोकळ्या जागा पाहून घरं बांधली आणि तिथे वस्त्या तयार झाल्या. अशाप्रकारे अंबरनाथमध्ये जवळपास 70 टक्के जागेवर चाळी, बैठी घरं आणि झोपडपट्ट्या आहेत. मात्र क्लस्टर किंवा एसआरए (SRA) योजना राबवायची असल्यास शासकीय जमिनीवर घरं असल्यानं अडथळे येत होते. हीच बाब लक्षात घेऊन अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार शासनाने जीआर काढत 2011 पर्यंतची सर्व निवासी अतिक्रमणं अधिकृत करण्यास मान्यता दिली आहे.
Balaji Kinikar: जीआरमुळे प्रत्येक घराला स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळणार
दरम्यान, या जीआरमुळे प्रत्येक घराला स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. यासाठी नगरपालिकेत अर्ज सादर करावा लागणार असून त्यानंतर टीएलआर विभाग घराची मोजणी करेल. तिथून तहसीलदार कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांना स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळेल. अशी देखील माहिती देण्यात आली आहे. या निर्णयाचा अंबरनाथमधील महालक्ष्मीनगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर, बारकू पाडा, स्वामी नगर, जावसई, मेटल नगर, बुवापाडा, खुंटवली, खामकरवाडी अशा मोठ्या लोकवस्तीला मोठा फायदा होणार आहे.
Balaji Kinikar: मोजणीची ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आवाहन
या निर्णयामुळे हजारो नागरिकांची घरं अधिकृत होणार असून त्यांना भविष्यात क्लस्टर किंवा एसआरए योजनेतून पुनर्विकास सुद्धा करता येऊ शकणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मोजणीची ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आवाहन आमदार किणीकर यांनी केलं आहे.
Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पत्नी लता शिंदे यांनी भरला मतदार गणती अर्ज
विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेअंतर्गत आज 147 - कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदार संघात ठाण्यातील शुभ दीप निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पत्नी लता एकनाथ शिंदे यांचा 'Enumeration Form' (गणती अर्ज) प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पूर्ण करून घेण्यात आला. लोकशाही प्रक्रियेला बळकटी देण्यासाठी आणि मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी निवडणूक विभागाकडून हे काम पूर्ण करण्यात आले. लोकप्रतिनिधींनी स्वतः सहभागी होत सर्व नागरिकांनी या विशेष मोहिमेत आपले अर्ज भरून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.या वेळी निवडणूक आणि महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या