Mohan Bhagwat: हिंदू देवतांची माहिती आता शालेय पाठ्यपुस्तकांतून दिसणार? मोहन भागवातांनी नेमकी काय केलीए मागणी?
Sarkarnama July 26, 2026 05:45 PM

नवी दिल्ली : ‘‘हिंदू देवतांची माहिती शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट असायला हवी,’’ असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. मुलांच्या मनात धर्माबाबत निर्माण होणाऱ्या शंकांचे निरसन करण्यासाठी पालकांनीही स्वतःला सक्षम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

Instagram: ‘इन्स्टाग्राम’ ठरलं आंदोलनाचं प्रभावी माध्यम! जंतर-मंतरपर्यंत पोहोचलेल्या प्रवासानं 'असा' घडवला इतिहास

नवी दिल्ली येथे शुक्रवारी ‘युगानुकूल मातृत्व’ या विषयावरील कार्यक्रमात भागवत बोलत होते. ते म्हणाले, की मुले अनेकदा हिंदू देवतांच्या रूपांबद्दल प्रश्न विचारतात, परंतु पालकांना त्यांची उत्तरे देता येत नाहीत. ही माहिती सुरुवातीपासूनच पाठ्यपुस्तकांत उपलब्ध असायला हवी. आपण मुलांना जे शिकवू, तेच ज्ञान ते आत्मसात करतील. वयाच्या पहिल्या १२ वर्षांपर्यंत मुलांचे संगोपन आपल्या हातात असते. त्यामुळे त्यांना माहिती देण्यासाठी आपणही शिकले पाहिजे.

Explainer: केवळ तीन महिन्यातच मोदी सरकारला बसले ३ जिव्हारी लागणारे झटके! आता पुढे काय? वारं कुठल्या दिशेनं वाहतंय?

कुटुंबातील कमी होत चाललेल्या संवादाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त करताना भागवत म्हणाले, की मोबाईलमुळे घरातील संवाद हरवत चालला आहे. आज कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे मोबाईल आहे. कामावरून किंवा शाळेतून परतल्यानंतर प्रत्येक जण मोबाईलमध्ये मग्न असतो. एकाच घरात असूनही लोक एकमेकांना भेटत नाहीत. आपण वेळ काढला तरच संवाद होईल आणि मुले आपली मते मोकळेपणाने मांडतील.

मुले पालकांच्या वागण्याचे बारकाईने निरीक्षण करतात, असे सांगून भागवत म्हणाले की, आपण जे सांगतो आणि जे वागतो यात तफावत नसावी. जर पालकांच्या वागण्यात आणि सांगण्यात फरक असेल, तर मुले त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. संस्कार हे प्रेम, संवाद आणि स्वतःच्या उदाहरणातून दिले जातात. हा पाया भक्कम असेल, तर मुले तंत्रज्ञानाच्या जाळ्यातून सहज बाहेर पडू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.