राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
मिकी घई, एबीपी माझा July 29, 2026 12:13 AM

Pune :  राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमुक्त करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. संपूर्ण योजनेसाठी एकूण 36 हजार 585 कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे. राज्य सरकारने नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात या योजनेसाठी 20 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. दरम्यान, याबाबत सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याची माहिती सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली आहे. पहिल्या यादीची सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे. 

एकूण 13 हजार 600 कोटी रुपयांची कर्जमाफी 

एकूण 13 हजार 600 कोटी रुपयांची कर्जमाफी केल्याची माहिती  सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली. यामध्य अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक 1 लाख 32 हजार 634 शेतकरी पात्र असल्याचे तावरे म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात कमी 3 हजार 708 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. तर बुलढाणा जिल्ह्यात 1 लाख 16 हजार लाभार्थी आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 लाख 5 हजार लाभार्थी आहेत. तर जालना जिल्ह्यात 1 लाख 60 हजार लाभार्थी आहेत. तर यवतमाळ जिल्ह्यात 1 लाख 1 हजार लाभार्थी असल्याची माहिती  सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली.  

कर्जमाफीची प्रक्रिया पुढील महिन्यात पूर्ण होणार 

राज्यातील सहा जिल्ह्यांत एक लाखांहून अधिक लाभार्थी असल्याचे  सहकार आयुक्त दीपक तावरे म्हणाले. दुसरी यादी दोन आठवड्यांत जाहीर होणार असल्याचे तावरे यांनी सांगितले. कर्जमाफीची प्रक्रिया पुढील महिन्यात पूर्ण होणार असल्याचेही ते म्हणाले. 

लवकरच शेतकऱ्यांना त्यांचे कर्ज नील झाल्याचे सर्टीफीकेट मिळणार : कृषीमंत्री दत्रात्रय भरणे

कृषीमंत्री दत्रात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच शेतकऱ्यांना त्यांचे कर्ज नील झाल्याचे सर्टीफीकेट मिळणार आहे. दोन लाखांपर्यंचे सरसकट कर्ज माफ होणार आहे. आमदार खासदार मंत्री यांच्या हस्ते शेतकऱ्यांना सर्टीफीकेट दिले जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. 

शेतकरी कर्जमाफीच्या (Farmers) यादीमध्ये गोंधळ असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे, दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची सरकारची घोषणा आहे, मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीच्या यादीत दोन लाखांपर्यंत कर्ज माफ होत नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. धाराशिवच्या (Dharashiv) गंधोरा गावात कर्जमाफीच्या यादीत 233 शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे, मात्र यादीतील 80% शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत गोंधळ असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आल्यानंतर आपलं पासबुकही पुरावा म्हणून माध्यमांसमोर दाखवलं  

2 लाखांच्या आता पैसे असेल तर कर्ज भरु नका

दरम्यान, 2 लाखाच्या आत कर्ज असेल तर पैसे भरायची गरज नाही. बँकेला कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांना त्रास देता येणार नाही. जर कर्ज रक्कम कुणाला नाकारण्यात आली असेल तर कागदपत्रे कुठेतरी कमी असतील, असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले. तसेच, लवकरच शेतकरी कर्जमुक्तीची पुढची यादी येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 2 लाख रुपयांच्या वर कर्ज असेल तर ते भरण्यासाठी देखील वेळ दिलेला आहे. आता 2 याद्या जाहीर झालेल्या आहेत, इतर देखील याद्या लवकरच जाहीर होतील. कोणीही टोकच पाऊल उचलू नये, असे आवाहन दत्तात्रय भरणे यांनी केलंय.  

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.