'बटवारा 1947'समोर तिप्पट कमाई केली इमरान हाश्मीच्या 'आवारापन 2'ने; 19 वर्षांनी पलटला खेळ; 10 दिवसात कोणी किती कमावले?
abp majha web team August 24, 2026 01:43 PM

Box Office Collection: ‘बटवारा 1947’ आणि ‘आवारापन 2’ हे यंदाच्या वर्षातील दोन मोठे चित्रपट एकाच दिवशी म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाले. दोन्ही चित्रपटांचा जॉनर वेगळा असला तरी बॉक्स ऑफिसवर त्यांच्यात थेट टक्कर पाहायला मिळतेय. (Box Office Collection) विशेष म्हणजे, तब्बल 19 वर्षांनंतर सनी देओल आणि इमरान हाश्मी यांच्या चित्रपटांमध्ये पुन्हा एकदा क्लॅश झाला. यावेळी मात्र चित्र पूर्णपणे बदललेलं दिसत आहे. ‘आवारापन 2’ने (Aavarapan 2) पहिल्याच दिवशी दमदार कमाई करत बॉक्स ऑफिसवर आघाडी घेतली, तर ‘बटवारा 1947’ला (Batwara 1947) त्याच्याशी टक्कर देणंही कठीण झालं. आता दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाला 10 दिवस पूर्ण झाले असून दोन वीकेंडही पार पडले आहेत. या बॉक्स ऑफिसच्या लढाईत इमरान हाश्मीच्या चित्रपटाने बाजी मारल्याचं दिसत आहे.

‘बटवारा 1947’ची बॉक्स ऑफिस कमाई

राजकुमार संतोषी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘बटवारा 1947’मध्ये सनी देओल, प्रीती झिंटा आणि शबाना आझमी यांसारखे दिग्गज कलाकार आहेत. जवळपास 120 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाला रिलीज होऊन 10 दिवस झाले असले तरी चित्रपटाला अपेक्षित कमाई करता आलेली नाही.सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, दुसऱ्या वीकेंडमध्येही सनी देओलच्या चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली नाही. 10 दिवसांत चित्रपटाने भारतात 36.80 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. तर ग्रॉस कलेक्शन 43.67 कोटी रुपये इतकं आहे. जगभरात या चित्रपटाने आतापर्यंत 52.52 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘बटवारा 1947’ची दिवसनिहाय कमाई

पहिला दिवस: 5.75 कोटी रुपये
दुसरा दिवस: 13.50 कोटी रुपये
तिसरा दिवस : 7.25 कोटी रुपये
चौथा दिवस: 2 कोटी रुपये
पाचवा दिवस: 2.25 कोटी रुपये
सहावा दिवस : 1.5 कोटी रुपये
सातवा दिवस : 1.35 कोटी रुपये
आठवा दिवस : 75 लाख रुपये
नववा दिवस :1.15 कोटी रुपये
दहावा दिवस : 1.30 कोटी रुपये

‘आवारापन 2’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई

इमरान हाश्मी, दिशा पाटनी आणि शबाना आझमी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘आवारापन 2’ मात्र पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग केली होती. जवळपास 45 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने केवळ 10 दिवसांत आपल्या बजेटच्या अनेक पटींनी कमाई केली आहे.10 दिवसांत ‘आवारापन 2’ने जगभरात तब्बल 192.80 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. भारतातील नेट कलेक्शन 136.25 कोटी रुपये असून ग्रॉस कलेक्शन 162.50 कोटी रुपये इतकं आहे.

‘आवारापन 2’ची दिवसनिहाय कमाई

पहिला दिवस: 22 कोटी रुपये
दुसरा दिवस: 33.75 कोटी रुपये
तिसरा दिवस: 26 कोटी रुपये
चौथा दिवस: 9.25 कोटी रुपये
पाचवा दिवस: 9.75 कोटी रुपये
सहावा दिवस: 6.75 कोटी रुपये
सातवा दिवस: 6 कोटी रुपये
आठवा दिवस: 5.75 लाख रुपये
नववा दिवस :8.25 कोटी रुपये
दहावा दिवस: 8.75 कोटी रुपये

19 वर्षांपूर्वीही सनी देओल आणि इमरान हाश्मी यांच्यात झालेला क्लॅश

विशेष म्हणजे, सनी देओल आणि इमरान हाश्मी यांच्या चित्रपटांमध्ये 19 वर्षांपूर्वीही बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली होती. 2007 मध्ये इमरान हाश्मीचा ‘आवारापन’ आणि सनी देओलचा ‘अपने’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी म्हणजेच 29 जून रोजी प्रदर्शित झाले होते. त्यावेळी समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळूनही ‘आवारापन’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. तर सनी देओलचा ‘अपने’ हा चित्रपट हिट झाला होता. मात्र, 19 वर्षांनंतर परिस्थिती बदलल्याचं दिसत असून यावेळी इमरान हाश्मीच्या ‘आवारापन 2’ने बॉक्स ऑफिसवर मोठी आघाडी घेतल्याचं चित्र आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.