नेपाळमध्ये 'जलप्रलय'! महापुरात महाराष्ट्रातील 80 नागरिक अडकल्याची माहिती; राज्य सरकारकडून हेल्प डेस्क कार्यरत
अभिषेक मुठाळ August 27, 2026 03:43 PM

Nepal Floods Marathi News: नेपाळमध्ये आलेल्या भयंकर पुरामुळे आतापर्यंत तब्बल 168 हुन अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 1,100 पेक्षा जास्त लोकांचा अजूनही शोध लागलेला नसल्याची माहिती आहे. नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या अचानक आलेल्या विनाशकारी पुरामुळे (Nepal Flash Flood) 466 परदेशी आणि 113 नेपाळी नागरिकांचा बेपत्ता झालेल्यांमध्ये समावेश आहे. यामध्ये 105 भारतीय आणि 37 अनिवासी भारतीयांचा समावेश आहे. अशातच या प्रलयकरी पुरात महाराष्ट्रातील 80 नागरिक नेपाळमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. तर अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. (Nepal Flash Flood Marathi News) 

Nepal Floods : जिल्हानिहाय माहिती संकलन आणि पडताळणी सुरू, मदतीसाठी राज्य सरकारकडून हेल्प डेस्क कार्यरत

दरम्यान, नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांमध्ये 80 पैकी 57 नागरिक ‘रिचा टूर्स’ या ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातून नेपाळला गेले असल्याची माहिती आहे. तर अडकलेल्या सर्व 80 नागरिकांची ओळख पटविण्याचे सध्या काम सुरू असून यातील 4 नागरिक सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे. एकीकडे SEOC महाराष्ट्रकडून जिल्हानिहाय माहिती संकलन आणि पडताळणी सुरू करण्यात आली असून दुसरीकडे अडकलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांशी आणि प्रवासी एजन्सीशी सातत्याने समन्वय साधण्यात येतोय. मदतीसाठी राज्य सरकारकडून हेल्प डेस्क कार्यरत करण्यात आल्याचीही माहिती आहे. गृह मंत्रालयाच्या Integrated Control Room – Emergency Response सोबतही महाराष्ट्र शासनाकडून समन्वय सुरू आहे.

नेपाळमध्ये अचानक आलेल्या विनाशकारी पुरामुळे हाहाकार माजला आहे. या पुराच्या पाण्यात इमारती, गावे, रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत. 168 लोकांचा मृत्यू झाला असून, 1,100 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते, नेपाळमधील पूर भूकंपामुळे नव्हे, तर उंचीवरून कोसळलेल्या हिमनदीमुळे आला आहे.

Chinese Ambassador Zhang Maoming: 'या कठीण काळात आम्ही नेपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत'

किंबहुना, चीनने नेपाळी बाजूला झालेल्या भूकंपाला हिमनदी फुटण्यासाठी जबाबदार धरले आहे. नेपाळमधील चीनचे राजदूत झांग माओमिंग यांनी रसुवामधील विनाशकारी पुराविषयी एका नेपाळी वाहिनीशी संवाद साधला. ते म्हणाले, "या कठीण काळात आम्ही नेपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत." सध्या उपलब्ध असलेल्या प्राथमिक माहितीनुसार, नेपाळी बाजूला भूकंप झाला, ज्यामुळे हिमस्खलन आणि त्यानंतर भूस्खलन झाले. परिणामी, ग्यिरोंग-रसुवागढी सीमावर्ती भागातील नेपाळी आणि चिनी दोन्ही बाजूंना मोठी जीवितहानी झाली असून काही व्यक्ती बेपत्ता आहेत.

Nepal Floods : आधी आणि नंतरची छायाचित्रे

प्लॅनेट लॅब्सने आधीची आणि नंतरची उपग्रह छायाचित्रे शेअर केली आहेत. ज्यामध्ये प्राथमिक अभ्यासात असेही उघड झाले आहे की, बर्फ आणि खडकांच्या भूस्खलनामुळे ल्हेंडे नदीत गाळयुक्त पूर आला होता. व्हिडिओ शेअर करताना नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने लिहिले आहे की - प्लॅनेट लॅब्सने उपग्रह प्रतिमांच्या केलेल्या विश्लेषणावर आधारित प्राथमिक अभ्यासात असे दिसून आले आहे की, नेपाळ-चीन रसुवागढी सीमा ओलांडण्याच्या ठिकाणापासून सुमारे २० किमी ईशान्येस नेपाळ-चीन सीमेवर बर्फ आणि खडकांचे भूस्खलन झाल्यामुळे ल्हेंडे नदीला हिमनदीमुळे पूर आला होता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.