सोलापूर : महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरीतील (Pandharpur) विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरील रासायनिक लेपनाची प्रक्रिया करायला अखेर मुहूर्त लागला आहे. त्यानुसार, आता 23 ते 25 सप्टेंबर या कालावधीत भारतीय पुरातत्व विभागाकडून विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीवर हे लेपन होणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी सांगितले आहे.
लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या विठुराया आणि रुक्मिणी माता यांच्या मूर्ती सातत्याने झीजत असल्याने, मंदिर समितीसह भाविकांची चिंता वाढली होती. त्यातच भारतीय पुरातत्व विभागाकडून होणाऱ्या रासायनिक लेपन प्रक्रियेला काही भाविकांनी विरोध करीत न्यायालयात दाद मागितल्याने याला जवळपास तीन महिने उशीर झाला होता. आता मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने या रासायनिक प्रक्रियेला हिरवा कंदील दाखविल्याने आता 22 सप्टेंबर रोजी शेजारतीनंतर भारतीय पुरातत्त्व विभाग आपल्या कामाला सुरुवात करणार आहे, अशी माहिती मंदिराचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी दिली.
पंढरीत वर्षाकाठी जवळपास अडीच ते तीन कोटी भाविक हे विठ्ठलाचे स्पर्श करून दर्शन घेत असल्याने मूर्तीची मोठ्या प्रमाणात झीज होत असते. मंदिर शासनाच्या ताब्यात आल्यापासून पहिले लेपन 1988 मध्ये केले होते. त्यानंतर थोड्या थोड्या कालावधीने चार वेळेला विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीवर लेपण करावे लागले होते.
विठ्ठला मूर्तीच्या चरणांवर लाखो भाविक वर्षानुवर्षे मस्तक टेकवतात आणि स्पर्श करतात. तसेच अभिषेक, तापमानातील बदल आणि आर्द्रता यामुळे दगडाची झीज होते. ही झीज वाढू नये, तडे भरून निघावेत आणि मूर्तीचे दीर्घकालीन संरक्षण व्हावे, यासाठी हे लेपन केले जाते.
परंपरेत या लेपनाला 'वज्रलेप' असे म्हटले जाते. मात्र, सध्या पुरातत्त्व विभाग (ASI) ज्या पद्धतीची शिफारस करतो, त्यात मान्यताप्राप्त आधुनिक रासायनिक संरक्षक लेप वापरला जातो. यात प्रामुख्याने इपॉक्सी राळ, दगडाची भुकटी आणि पाणी न झिरपणारे सिलिकॉन आधारित पदार्थ वापरले जातात, अशी माहिती भारतीय पुरातत्व विभागाचे निवृत्त उपसंचालक आणि रसायन तज्ज्ञ विलास पुनीराज यांनी दिली.
लेपणाचा कालावधी हा भाविकांचा स्पर्श, अभिषेक आणि वातावरणावर अवलंबून असतो. पंढरपूरमध्ये यापूर्वी केलेले संरक्षणात्मक लेपन साधारण ५ ते ६ वर्षे व्यवस्थित राहिल्याचे अनुभव आहेत. त्यानंतर पुन्हा मूर्ती जिजल्यावर त्यावर नव्याने लेपन करावे लागते. पुरातत्त्व विभागाचे सांगण्यानुसार भारतामध्ये पुरातत्व विभाग ज्या मान्यताप्राप्त पद्धतीचा वापर करतो तीच पद्धत विठ्ठल मूर्तीवर देखील वापरण्यात येते. पुरातत्त्व विभाग वापरत असलेली रसायन हे देखील हर्बल म्हणजेच नैसर्गिक असून ते मान्यता प्राप्त असल्याने त्याचा वापर केला जात असल्याचा दावा केला आहे.
सध्या विठ्ठल मूर्तीच्या पायावर एक खड्डा पडला असून पाय पूर्ण झिजून गेले आहेत. याच पद्धतीने मूर्तीला अनेक ठिकाणी लेपनाची गरज भासत असून तातडीने ही प्रक्रिया राबविणे गरजेचे होते. त्यानुसार आता मंदिर समिती आणि प्रशासनाने भारतीय पुरातत्व विभागाच्या मदतीने ही रासायनिक लेपनाची प्रक्रिया करणार आहेत.