मोबाईलवरुन माणसं हिंसक का हाेत आहेत?
esakal September 08, 2024 06:45 AM

- मुक्ता चैतन्य

नुकतीच पुण्यात घडलेली घटना. हडपसरमध्ये. एका मध्यमवयीन व्यक्तीनं अनोळखी मुलांना हॉटस्पॉट-सेवा देण्यास नकार दिल्यावर झालेल्या वादातून त्या मुलांनी त्या व्यक्तीवर कोयत्यानं वार केले आणि त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

दुर्दैवानं अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते आहे. पालकांनी गेमिंग करताना मुलांना टोकलं तर मुलं चिडतात, धुसफूस करतात, इतकंच नव्हे तर, काही प्रसंगांत मुलांनी आई-वडिलांवर हात उगारण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत.

काही घटनांमध्ये पालकांना गंभीर दुखापत झालेली आहे, काही घटनांमध्ये त्यांचे मृत्यू ओढवलेले आहेत. इंटरनेटचं व्यसन हा अतिशय गंभीर मानसिक आजार आहे. मोबाईलच्या सततच्या वापरामुळं मेंदूला तात्पुरती आनंदाची अनुभूती मिळते आणि मग मोबाईल आणि त्यातलं इंटरनेट हाच आनंदाचा स्रोत बनतं.

त्यामुळं, हा आनंद मिळाला नाही तर माणसांची प्रतिक्रिया तीव्र बनते. सतत स्क्रीनवर काहीतरी बघत राहणं; मग तो सोशल मीडिया असेल नाहीतर त्यावरील रील्स, विविध गेम्स खेळणं. सततच्या नोटिफिकेशन्सनं माणसांच्या मनात अस्थिरता निर्माण होते. अशा वेळी इंटरनेट किंवा मोबाईल उपलब्ध नसेल तर असुरक्षिततेची भावना वाढू शकते आणि त्यातून राग वाढतो आणि ती रागाची भावना हिंसक वर्तनात बदलते.

इंटरनेटचं व्यसन म्हणजे काय?

इंटरनेटच्या व्यसनात व्यक्तीच्या मनात सतत इंटरनेटचाच विचार येतो. सतत ऑनलाईन जाण्याची भावना तीव्र असते. सतत इंटरनेटचा वापर करण्याची इच्छा बळावल्यामुळं वास्तविक जीवनातल्या जबाबदाऱ्या आणि संबंधांकडं हळूहळू दुर्लक्ष व्हायला लागतं. इंटरनेटवर सोशल मीडिया,

ऑनलाइन गेमिंग, व्हिडिओ स्ट्रिमिंग, आणि सततचं चॅटिंग, पोर्न व्हिडिओ किंवा क्लिप्स बघणं, गुगल सर्च, सतत माहिती गोळा करणं, रील्स बघण्यात तासन् तास घालवणं या सगळ्यांचंच व्यसन लागू शकतं. इंटरनेटपासून दूर राहण्याचा प्रयत्न केल्यावर माणसांना बेचैनी, चिडचिड जाणवते, राग येतो. ताण वाढतो.

लक्षणं कोणती आहेत?
  •  सतत इंटरनेटवर राहण्याची तीव्र इच्छा होणं.

  •  इंटरनेटवर विविध गोष्टी करण्यासाठी आपण किती वेळ देतो आहोत यावर नियंत्रण नसणं.

  •  ऑनलाईन वेळेचं नियोजन न करता येणं.

  •  कामावरचं किंवा अभ्यासातलं लक्ष उडणं. विचलित होणं.

  •  इंटरनेट, मोबाईल वापरायला न मिळाल्यास चिडचिड होणं, राग येणं, संताप होणं. अस्वस्थ वाटणं.

  •  इंटरनेटच्या अतिवापरामुळं दैनंदिन जीवनातल्या जबाबदाऱ्या, कुटुंबीय नातेसंबंध, झोप आणि वैयक्तिक काळजी यांचं नुकसान झालं तरीही इंटरनेटसाठीचा वेळ कमी करण्यास तयार न होणं.

इंटरनेटच्या अवलंबित्वामुळे मेंदूत काय घडतं?
  • इंटरनेटच्या अवलंबित्वातून मेंदूत काही महत्त्वपूर्ण बदल घडतात, असं आता संशोधनातून पुढं येत आहे.

  • इंटरनेटचा दीर्घ काळ वापर मेंदूतल्या डोपामाइन केंद्रावर परिणाम करतो. डोपामाइन हा मेंदूत एक न्यूरोट्रान्समीटर आहे, जो आनंदाच्या आणि समाधानाच्या भावना उत्पन्न करतो. सतत इंटरनेटवर वापरणाऱ्या व्यक्तींमध्ये डोपामाइनचा स्तर वाढलेला असतो. त्यातून मिळणारी किक अनुभवण्यासाठी पुनःपुन्हा इंटरनेटवर येण्याची तीव्र इच्छा होत राहते. यामुळं मेंदूची क्षमता कमी होऊन ताण-तणाव, नैराश्य आणि मानसिक आरोग्याच्या इतर समस्या उद्भवू शकतात. मेंदूशी निगडित इतरही समस्या दिसून येऊ लागल्या आहेत.

  • ज्या मुलांचा मोबाईलचा वापर जास्त आहे त्यांना फोकस करता येत नाही, त्यांची चिडचिड अधिक प्रमाणात होते.

इंटरनेटचं व्यसन सोडवणं अवघड आहे का?

कुठलंही व्यसन सोडवणं अवघड असतं. यात इच्छाशक्ती हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याहूनही महत्त्वाचं आहे ते, आपण इंटरनेट-ॲडिक्ट आहोत हे समजून घेणं. अनेकदा माणसांना ‘आपल्याला इंटरनेटचं व्यसन लागलेलं आहे,’ हेच लक्षात येत नाही, त्यामुळं ‘त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत’ हेही लक्षात येत नाही.

मोबाईलवर सोशल मीडिया, चॅटिंग, पोर्न आणि ऑनलाइन गेम्स यांसारख्या गोष्टींमध्ये अडकलेल्या व्यक्ती सतत तात्पुरत्या आनंदाच्या क्षणांचा अनुभव घेत असतात. हा आभास असतो; पण त्यानं छान वाटत राहतं.

त्यामुळं मोबाईल नसेल तर आयुष्य नीरस होईल अशी भावना प्रबळ होत जाते. इंटरनेटशिवाय आपण आनंदानं जगू शकतो हा विचार मनातून नाहीसा होतो आणि हे व्यसन अधिकाधिक किचकट होत जातं.

नकारात्मक भावना उत्तेजित होतात?

इंटरनेटच्या अतिवापरामुळं नकारात्मक भावना निर्माण होतात. सतत इंटरनेटवर राहिल्यामुळं, व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. जास्त स्क्रीन, कमी झोप, प्रत्यक्ष संवाद कमी, प्रत्यक्ष गोष्टी कमी करणं आणि आभासी जगावर अधिकाधिक अवलंबून राहणं या सगळ्यातून चिडचिड, नैराश्य, एकटेपणा,

अस्वस्थता अशा नकारात्मक भावना बळावण्याची शक्यता असते. सतत इतर कुणीतरी काही तरी केलेलं वाचत-ऐकत-बघत राहण्याचाही ताण मनावर येत असतो. आपल्यात हे भावनिक बदल होत आहेत हेही अनेकदा त्या व्यक्तीच्या लक्षात येत नाही. मात्र, आजूबाजूच्या लोकांना हे जाणवत असतं. त्यांनी या बदलांकडं दुर्लक्ष करू नये.

उपाय काय?
  •  व्यक्तीनं स्वतःच्या इंटरनेटवापराचं निरीक्षण करावं, अतिवापर कमी करण्याचा प्रयत्न करावा.

  •  लहान मुलांच्या वापरावर बंधन हवं.

  •  वर्तणुकीय बदलांकडं दुर्लक्ष नको.

  •  वेळेचं नियोजन करणं आवश्यक. आपले अग्रक्रम टाळून इंटरनेटला महत्त्व देऊ नये.

  •  ताण-तणाव हाताळण्यासाठी, भावनांचा निचरा करण्यासाठी कधीही सोशल मीडिया, पोर्न यांचा वापर करू नये. तात्पुरतं बरं वाटलं तरी मूळ कारणावर काम करणं दीर्घकालीन उपयुक्त ठरतं.

  •  प्रत्यक्ष संवादावर भर हवा.

  • आपल्याला काय आवडतं याचा विचार करावा. त्यासाठी दिवसातला १५ मिनिटांचा वेळ तरी द्यावाच. छंद जोपासावेत. झोप पूर्ण होईल हे बघावं. झोप झाली नाही तर अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होतात. आवश्यकता भासल्यास समुपदेशकांची मदत घ्यावी.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.