भारतीय फुटबॉलला यशाच्या उंचीवर नेण्याचा ध्यास...! ISL क्लबच्या प्रशिक्षकांचा निर्धार
esakal September 08, 2024 06:45 AM

Indian Super League 2024-25: इंडियन सुपर लीग (ISL) 2024-25 मीडिया डे चा दुसरा दिवस कोची इथे ५ सप्टेंबर रोजी पार पडला. यावेळी बंगळुरू एफसी, हैदराबाद एफसी, एफसी गोवा, चेन्नईयन एफसीसह गतवर्षीच्या आयएसएल चषक विजेत्या मुंबई सिटी एफसी आणि केरला ब्लास्टर्स एफसी या संघांचे प्रतिनिधी उपस्थितीत होते.

यावेळी प्रत्येक संघाच्या प्रतिनिधिनींनी आगामी हंगामाबद्दल आपली मतं व्यक्त केली. आपल्या संघाच्या तयारीबाबत आणि ध्येयाबाबतही भाष्य केले.

बदल हा फुटबॉलचा भाग

सर्वातआधी मुंबई सिटी एफसीचे प्रतिनिधींनी संवाद साधला. यावेळी मुंबईचे प्रशिक्षक पीटर क्रॅटकी यांच्यासह खेळाडू फुरबा लाचेनपा, जॉन टोरल, आयुष चिकारा हे उपस्थित होते.

दरम्यान, या हंगामापूर्वी राहुल भेके, अल्बर्टो नोगुएरा आणि जॉर्ज पेरेरा डियाझ या तीन प्रमुख खेळाडूंनी बंगळुरू एफसीमध्ये सामील झाल्यामुळे मुंबई सिटी एफसीने संघाचा एक छोटासा फेरबदल केला. याबाबत बोलताना क्रॅटकी यांनी विश्वास व्यक्त केला की असे बदल होणे सामान्य आहेत.

ते म्हणाले, “आम्ही एक नवीन अध्याय सुरू करत आहोत, म्हणूनच मी खूप उत्साहित आहे. आमच्याकडे नवीन खेळाडू आणि स्टाफ आहे. आमची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आम्ही पडद्यामागे खूप कठोर परिश्रम करत आहोत. प्रक्रिया सुरू ठेवणे महत्त्वाचे आहे, आम्हाला नेहमीच अव्वल राहायचे आहे. बदल हा फुटबॉलचा भाग आहे, लोक येतात आणि जातात, परंतु आम्ही नेहमी एकत्र काम करण्याचा आणि पूर्वीप्रमाणेच काम करण्याचा प्रयत्न करतो.”

भारतीय फुटबॉल सुधारण्याचे आपले कर्तव्य

चेन्नईन एफसीचे मुख्य प्रशिक्षक ओवेन कोयल यांनीही महत्त्वाचे भाष्य केले. त्यांनी भारतीय युवा खेळाडूंच्या क्षमतेचे कौतुक केले आणि राष्ट्रीय संघ फिफा विश्वचषक पात्रतेसाठी लक्ष्य ठेवू शकेल, असंही म्हटले.

कोयल म्हणाले, "भारतीय फुटबॉल सुधारण्याचे आपले कर्तव्य आहे. इंडियन सुपर लीगची खूप चर्चा व्हावी अशी आपली इच्छा आहे. आता माझा चांगला मित्र मॅनोलो मार्केझ भारतीय संघासोबत आहे, आशा आहे की राष्ट्रीय संघही फिफा क्रमवारीत वर जाण्यास सुरुवात करेल. आम्ही 8-10 वर्षांत फिफा विश्वचषकासाठी पात्र होण्यासाठी काम करू शकू. भारताकडे खरी क्षमता आहे."

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ केरला ब्लास्टर्स नव्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली खेळणार

यंदा केरला ब्लास्टर्स नवीन प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार आहे. यंदा केरला ब्लास्टर्सने मिकेल स्टाहरे यांची प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. त्यांनी घरच्या चाहत्यांबाबत भाष्य केले आहे.

स्टाहरे म्हणाले, “केरला ब्लास्टर्स एफसी हा मोठा चाहता वर्ग असलेला क्लब आहे. या क्लबच्या सामन्यादरम्यान स्टेडियम पूर्णपणे भरलेले असतात. हे एक मी या संघात येण्यामागील एक कारण आहे."

"आम्ही थायलंडमध्ये एका महिन्यासाठी उत्तम सुविधांसह प्रशिक्षण घेतले आणि मला याचा खूप आनंद आहे. आम्ही पहिल्या सेकंदापासून वचनबद्ध असू. संघात खेळाडूंचा एक मोठा गट आहे जो स्वत:चा विकास करण्यास उत्सुक आहे.”

"सामन्यांवरही वर्चस्व ठेवायचंय"

गेरार्ड झारागोझा बंगळुरू एफसी बरोबरच्या त्यांच्या पहिल्या संपूर्ण हंगामासाठी उत्सुक आहेत. त्यांनी गेल्यावर्षी हंगामाच्या अर्ध्यात संघाची जबाबदारी स्विकरली होती. आता संघात नवे खेळाडूही सामील झाले आहेत. याबाबत गेरार्ड यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

ते म्हणाले, "आम्ही प्री-सीझनपासून खेळाडूंना साईन करून चांगलं काम केलंय. हे आमच्यासाठी यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे आहे. आमच्यासाठी बॉलवरच नाही, तर सामन्यांवरही वर्चस्व ठेवणे, महत्त्वाचे आहे. आमचं लक्ष्य चाहत्यांना आनंद देणे, शक्य तितके सामने जिंकणे आणि आम्ही कुठपर्यंत पोहचू शकतो, हे पाहाणे आहे."

पुनरागमन करण्यास सज्ज - संदेश झिंगन

यंदाच्या हंगामात एफसी गोवाचा बचावपटू संदेश झिंगन गुडघ्याच्या दुखापतीतून पुनरागमन करत आहे. त्याला गेल्यावेळी अर्धा हंगाम दुखापतीमुळे मुकावे लागले होते. पण आता तो पुनरागमनासाठी सज्ज आहे. याबाबत त्यानेही भाष्य केले.

तो म्हणाला, 'एका महत्त्वाच्या टप्प्यावर, अर्धा हंगाम झाल्यानंतर मला सामन्यांना मुकावे लागले, राष्ट्रीय संघासाठी महत्त्वाच्या सामन्यांना मुकावं लागलं. पण माझ्या आजूबाजूच्या लोकांसाठी मी खरंच भाग्यवान आहे आणि कृतज्ञही आहे. मी आता संघासह सराव सुरू केलाय. मी आगामी सामन्यांमधूनच पुनरागमन करेल.'

ISL मध्ये घडणार इतिहास! तब्बल १३३ वर्षांची परंपरा असलेला मोहम्मेडन स्पोर्टिंग संघही उतरणार स्पर्धेत हैदराबादला यंदा चांगल्या कामगिरी

गेल्या हंगामात हैदराबाद एफसीची कामगिरी निराशाजनक राहिली. पण यंदा नव्याने सुरुवात करणार असल्याचे निर्धार मुख्य प्रशिक्षक थांगबोई सिंगटो यांनी व्यक्त केला. तसेच संघाचे जुने वैभव पुन्हा मिळवण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.

सिंगटो म्हणाले, “आमचा प्रवास खूप मनोरंजक होता, असं मी म्हणेन. त्यासाठी काही युवा खेळाडूंनी जोरदार प्रतिसाद दिला. आम्हाला पुन्हा तयारी करायची आहे आणि मजबूतीने परत यायचे आहे. मला आशा आहे की हैदराबाद एफसी देखील आयएसएल चॅम्पियन आहे हे कोणीही विसरणार नाही. मला खात्री आहे की आम्ही यावर्षी चांगली कामगिरी करू."

इंडियन सुपर लीगला १३ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. सलामीचा सामना मोहन बगान सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई सीटी एफसी संघात होणार आहे. या लीगमधील सामने JioCinema आणि Sports18 नेटवर्कवर पाहाता येणार आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.