Duleep Trophy: कर्णधार ऋतुराज, ईशान किशन अपयशी; भारत क संघाची ७ बाद २१६ अशी घसरगुंडी
esakal September 21, 2024 07:45 AM

Duleep Trophy 2024 India A vs India C: आकिब खान आणि शम्स मुलानी यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे भारत अ संघाला दुलीप करंडक सामन्यात भारत क संघाविरुद्ध आघाडी मिळवण्याची संधी मिळाली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर त्यांचा संघ ८१ धावांनी पुढे आहे.

भारत अ संघाचा पहिला डाव २९७ धावांत संपल्यानंतर त्यांनी भारत क संघाची सात बाद २१६ अशी अवस्था केली आहे. ८२ धावा करणाऱ्या अभिषेक पोरेलचा अपवाद वगळता भारत क संघाचे प्रमुख फलंदाज अपयशी ठरले. यात कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि धडाकेबाज ईशान किशन यांचा समावेश आहे.

Duleep Trophy: श्रेयस अय्यरचे अपयश कायम; संजू सॅमसनच्या शानदार नाबाद ८९ धावा

भारत क संघाचा सलामीवीर ऋतुराज संघाच्या २९ धावा झाल्या असताना बाद झाला, तर रजत पाटीदार शून्यावर माघारी फिरल्यामुळे त्यांची दोन बाद २९ अशी अवस्था झाली. पाठोपाठ गेल्या सामन्यातील शतकवीर ईशान किशनही पाच धावांवर बाद झाल्यामुळे भारत क संघाच्या अडचणी वाढल्या.

त्यातच दुसरा सलामीवीर साई सुदर्शनही बाद झाला. चार बाद ४१ या अवस्थेनंतर अभिषेक पोरेल आणि बाबा इंद्रजित यांनी डाव सारवला, परंतु ३४ धावा काढल्यानंतर इंद्रजितला दुखापतीमुळे पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

Duleep Trophy: सॅमसनच्या शतकाला कॅप्टन ईश्वरनचे शतकी प्रत्युत्तर; मुशीर खानसह सूर्यकुमारही अपयशी

त्याअगोदर कालच्या सात बाद २२४ धावांवरून आज खेळ पुढे सुरू करणाऱ्या भारत अ संघाचा शाश्वत रावत आणखी दोनच धावा करू शकला. त्याने एकूण १२४ धावांची खेळी केली, परंतु आवेश खानने आक्रमक ५१ धावांची, तर प्रसिद्ध कृष्णा याने ३४ धावांची खेळी केली. त्यामुळे त्यांना २९७ धावांपर्यंत मजल मारता आली.

संक्षिप्त धावफलक : भारत अ, पहिला डाव : २९७ (शाश्वत रावत १२४, शम्स मुलानी ४४, आवेश खान नाबाद ५१, प्रसिद्ध कृष्णा ३४, अंशुल कंबोज १७-३-४९-३, गौरव यादव १७.५-७-५७-२, विजयकुमार वैशक २१-३-५१-४).

भारत क, पहिला डाव : ७ बाद २१६ (ऋतुराज गायकवाड १७, साई सुदर्शन १७, ईशान किशन ५, बाबा इंद्रजित ३४, अभिषेक पॉरेल ८२, पुलकित नारंग ३५, आवेश खान १२-१-५२-१, आकिब खान १३-१-४३-३, तनुष कोटियन १५-२-३८-१, शम्स मुलानी १०-१-३०-२).

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.