मनोज जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर राज ठाकरे, थेट टीका; ‘त्या’ विधानावरून काय म्हटलं?
Shital Mandal September 23, 2024 01:54 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता मनोज जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर आले आहेत. शाळांपर्यंत जातीवाद गेला आहे. विद्यार्थ्यांना तसा त्रास होत आहे. त्यावरून महाराष्ट्रात जातीयवादाचं विष खोलपर्यंत गेलं आहे. असा महाराष्ट्र कधीच नव्हता, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्या या विधानावर मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. त्यावेळी राज ठाकरे यांना मोठा कळवळा आला होता. आता गावांमध्ये आम्हाला रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्याचं काय? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला. आमचं आंदोलन सुरू असताना राज ठाकरे यांनी एक विधान केलं होतं. शाळेत गेलो तरी तिथं जातीयवाद गेल्याचं राज ठाकरे म्हणाले होते. आता जातीवाद कोण करतोय? मुलांना त्यांनी (भुजबळ समर्थकांनी) काय बोलायचं ते शिकवलं होतं. जातीवादच नाही का? आम्ही काहीही केलं नाही. तरी शाळेपर्यंत जातीवाद गेला असं सांगितलं गेलं. त्याचा कळवळा राज ठाकरेंना आला, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.

नाच्यासारखा थयथयाट

आमचा रस्ता बंदच केला. हेच आम्ही केलं असतं तर मराठ्यांनी गरीब जातींना वाळीत टाकलं असं म्हटलं असतं. हेच आम्ही केलं असतं तर महान योग गुरू, आयुर्वेदाचार्य भुजबळ यांनी थयथयाट केला असता. एखाद्या नाच्यासारखा थयथयाट झाला असता. माझ्या ओबीसीला त्रास दिला असं म्हटलं असतं. आम्ही केलं असतं तर आमच्या जातींना वाळीत टाकलं म्हटलं असतं, असं मनोज जरांगे म्हणाले.

बौद्धांसारखच शोषण

आमचा रस्ता बंद केला. पाटातून जा म्हणतात. गावातून जाऊ नका असं आम्हाला सांगत आहेत. पूर्वी बौद्धांचं जसं शोषण झालं तसं आमचं झालं. बौद्धांना जसं वाळीत टाकलं जात होतं, तसं आमचं होतंय. दवाखाना, शाळा आणि कॉलेजात जायचे आमचे रस्ते बंद केले आहेत. उद्या कोणी मेलं, काही झालं तर दवाखान्यात जायचं कसं? उद्या आम्ही केलं असतं तर मराठ्यांनी केलं असं म्हटलं असतं. अन्याय झाला म्हणून बोंब मारली असती. आता मराठ्यांना वाळीत टाकलं. सरकार आहे का हे? फडणवीस आणि भुजबळ सरकार चालवतात का? आमचा रस्ता बंद केला. आम्ही त्या रस्त्याने गेलो तर आम्हाला मारत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.