Pune News : आळंदीमध्ये मराठा समाजाचा बंद; अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद
esakal September 23, 2024 03:45 AM

आळंदी : सकल मराठा समाज यांचे कडून संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या उपोषणाची सरकार दखल घेत नसल्यामुळे सरकारच्या निषेधार्थ केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत आळंदी मध्ये बंद पाळण्यात आला.

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. आळंदीकरांसह येथील सर्व व्यावसायिक यांनी सकाळी बंद पाळला. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. सकल मराठा समाजाच्या वतीने केलेल्या आव्हानास आळंदीकरांनी सगळ्यानी बंद पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

माउलींच्या समाधी मंदिरासमोरील महाद्वार चौक,शनि मंदिर रस्ता,भराव चौक,प्रदक्षिणा मार्ग, चावडी चौक,पालिका चौकातील दुकाने बंद होती. मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी चाकण चौक ते पालिका चौक अशी फेली काढली.एक मराठा लाख मराठा च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.आरक्षण आम्ही घेणारच म्हणत रॅलीमधिल आंदोलकांनी शहरातून फेरी काढली.

आणि पालिका चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार घालून आरक्षणाबाबत भूमिका वक्त्यांनी मांडली. त्यानंतर जनजिवन सुरळीत सुरु झाले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.