“मेहबूब तुझी औकात काय?” शिवसेना आमदाराची जीभ घसरली
Shital Mandal September 23, 2024 01:54 AM

Chandrakant Patil on Mehboob Shaikh : राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. त्यामुळे आता सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यातच आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच आता मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार मेहबूब शेख यांच्यावर टीका केली आहे. ओय मेहबुब तुझी औकात काय? अशा शब्दात त्यांनी घणाघात केला.

महबूब शेख यांनी काल शिवस्वराज्य यात्रेत बोदवडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांनी “रोहिणी खडसेंच्या गाडीवर हल्ला करता तेव्हा तुम्हाला लाडकी बहीण आठवत नाही का? बहिणीचा सन्मान करू शकत नाही अशा आमदाराचं करायचं काय? अशा आमदारांना धडा शिकवायला हवा. यांची मतदार संघात दादागिरी वाढली आहे”, अशा शब्दात टीका केली होती. त्यावर आता चंद्रकांत पाटील यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले होते.

“तुला योग्य वेळी योग्य जागा दाखवू”

“मेहबुब शेख हा सुपारी घेऊन बोलणारा माणूस आहे. ओय मेहबुब तुझी औकात काय? बोलतोय काय? आता तुझी औकात दाखवण्याची वेळ आली आहे. तेव्हा तुझी औकात तुला दाखवू, तुझा जेवढा पगार आहे तेवढाच बोल, पगाराच्या बाहेर जाऊन बोलू नको. एका हिंदू महिलेविषयी तू बोलतोस, त्यामुळे तुला योग्य वेळी योग्य जागा दाखवू”, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी टीका केली.

“मेहबूब शेख हा गुन्हेगार आमच्यावर काय बोलेल. मेहबूब हा ग्रामपंचायत नगरपालिका सदस्य निवडून आणू शकत नाही. आमच्या मतदारसंघात येऊन बोलतोय. सुपारीबाज आहे. तुझ्यासारख्याने आम्हाला काय सांगायचं, तू चित्रा वाघ या महिला भगिनींवर टोकाच्या भाषेवर बोलतोय”, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

“राजकारणातून उत्तर द्यावाच लागतं”

तसेच यावेळी चंद्रकांत पाटील यांनी खासदार अमोल कोल्हेंवरही टीका केली आहे. अमोल कोल्हे यांचा कार्यक्रम पेड असतो. अमोल कोल्हे हा नाटकी माणूस आहे. अमोल कोल्हे आधी शिवसेनेत होते. शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेले. काय साक्षात्कार त्यांना झाला. लाखो रुपये घेतात तेव्हा ते शंभूराजेचा इतिहास सांगतात. अमोल कोल्हे पन्हाळगडावर अश्लील चित्रपट शूट करतात. अमोल कोल्हे माझा मित्र आहे, मात्र शेवटी राजकारण असतो आणि राजकारणातून उत्तर द्यावाच लागतं. त्यांना राजकारणात मी बघितला आहे. पैसे घेऊन ते कसे नाटकं करतात, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.