राजापूर मतदारसंघात महिला मतदार अधिक
esakal September 24, 2024 10:45 PM

राजापूर मतदारसंघात महिला मतदारांची संख्या अधिक

प्रांताधिकारी डॉ. जॅसमिन ःअंतिम यादी प्रसिद्ध, १ हजार ३३३ दिव्यांगांची नोंद

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २४ ः राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार नोंदणीसाठी विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. मतदारांची छायाचित्रासह अंतिम मतदार प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये 2 लाख 36 हजार 61 एकूण मतदार असून त्यामध्ये 1 लाख 23 हजार 268 महिला, तर 1 लाख 12 हजार 793 पुरुष मतदारांचा समावेश असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. जॅसमिन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रांत कार्यालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रांताधिकारी डॉ. जास्मिन यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीसंबंधित सविस्तर माहिती दिली. जुलै 2024 मध्ये छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावेळी मतदारसंघामध्ये 2 लाख 34 हजार 109 एकूण मतदार होते. त्यानंतर गेल्या महिन्यामध्ये अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार एकूण 2 लाख 36 हजार 61 मतदार झाले आहेत. त्यामध्ये 4 हजार 421 ज्येष्ठ नागरीक, 3 हजार 846 युवा आणि 1 हजार 333 दिव्यांग मतदारांचा समावेश आहे, अशी माहिती डॉ. जॅसमिन यांनी दिली.
------
चार नवीन मतदान केंद्रांची निर्मिती

लोकसभा निवडणुकीमध्ये राजापूर मतदारसंघामध्ये 341 मतदान केंद्र होती. त्यामध्ये नव्याने चार मतदान केंद्राची भर पडली आहे. त्यामध्ये लांजा तालुक्यातील चिंचुर्टी, लांजा, केळंबे अशा तीन आणि राजापुरातील साखरीनाटे या एका मतदान केंद्राचा समावेश आहे. दोन मतदार केंद्रावर 1 हजार 400 पेक्षा जास्त मतदार आहेत. दोन मतदान केंद्र खूप लांब आहेत. त्यामुळे नवीन चार मतदान केंद्र तयार करण्यात आली असून या नव्याने वाढलेल्या मतदान केंद्रांनतर राजापूर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी 345 मतदान केंद्र असतील, असे प्रांताधिकारी डॉ. जॅसमिन यांनी सांगितले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.