आळंदीत इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली, प्रदूषणाचा विषय ऐरणीवर
Marathi September 24, 2024 11:24 PM

तीर्थक्षेत्र देहू आळंदी येथून वाहणाऱ्या पवित्र इंद्रायणी नदीला नदी प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. हे ग्रहण सुटता सुटत नसल्याने भाविक नागरिकांत प्रचंड नाराजी पसरली आहे. गेल्या दोन महिन्यात अनेक वेळा नदी प्रदूषणाने फेसाळली. यात पुन्हा मंगळवारी ( दि. 24 ) इंद्रायणी नदीचे प्रदूषण पाणी फेसाळलेले आल्याने प्रदूषण वाढले. यामुळे आळंदीतील नदी प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आला.

आळंदी देहू सह पुण्यातील नद्या प्रदूषण मुक्त होण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने प्राधान्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिक, भाविक आपल्या भावना व्यक्त करीत आहेत. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्यास तात्काळ उपाय योजना हाती घेण्याची मागणी नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश रहाणे, आळंदी जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मेल द्वारे इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त व्हावी, यासाठी निवेदन आळंदी जनहित फाउंडेशनचे वतीने देण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील नद्या प्रदूषण मुक्त होण्यासाठी निवडणूक आचार संहिता लागू होण्यापूर्वी प्रभावी निर्णय घेऊन विकास कामांना मंजूरी देऊन इंद्रायणी नदीचे दुतर्फ़ा तात्काळ सांडपाणी थेट नदीत जाऊ नये यासाठी दोन्ही बाजूने नाली विकसित करण्याचे काम सुरु व्हावे अशी मागणी आळंदी जनहित फाउंडेशन तर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे म्हणाले, नदीचे प्रदूषण रोखण्यास उपाय योजना केल्या जात आहेत. यासाठी प्रस्ताव देण्यात आला. आहे. लवकरच पिंपरी चिंचवड आयुक्त अध्यक्ष असलेल्या समितीची बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.