'मधली सुट्टी' नाट्यप्रयोगातून मुलांच्या आहाराबाबत जागृती
esakal October 11, 2024 04:45 AM

पुणे, ता. १० ः अजिंक्य शेकदार स्मृती फाउंडेशनच्या ‘मी अजिंक्यच’ संस्थेतर्फे आयोजित आणि ‘प्रेरणा- एक कलामंच’तर्फे दिग्दर्शित ‘मधली सुट्टी’ नावाचा अभिनव नाट्यप्रयोग नुकताच टिळक स्मारक मंदिर येथे सादर करण्यात आला. मुलांनी पौष्टिक अन्न, वेळच्या वेळी आणि लक्षपूर्वक सेवन करावे, चांगल्या आरोग्याचा अन्नाशी असलेला संबंध हसत खेळत त्यांच्या लक्षात आणून द्यावा, यासाठी करमणुकीतून शिक्षण देण्याचा हा अभिनव प्रयोग होता. विविध शाळांतील एकूण १३ मुले आणि पाच मोठ्या कलाकारांनी मिळून हा नाट्यप्रयोग सादर केला. या वेळी झालेल्या परिचर्चेत मानसशास्त्रज्ञ डॉ. शिरीषा साठे, पालक प्रशिक्षक व सल्लागार डॉ. दिनेश नेहेते आणि आहारतज्ज्ञ डॉ. विभूषा जांभेकर यांनी मार्गदर्शन केले.
संस्था लहान मुलांच्या आरोग्यासाठी काम करते. विशेषतः, कर्करोग व तत्सम मोठ्या आजारांनी पीडित मुले आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देणे आणि स्वास्थ्यविषयक जनजागृती निर्माण करणे, या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करत असते, अशी माहिती या संस्थेचे संस्थापक नीलेश शेकदार, प्रज्ञा वझे यांनी दिली.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.