Donald Trump Video : निवडणुकीच्या धामधुमीत मॅकडोनाल्ड्स काम करताना दिसले डोनाल्ड ट्रम्प? कमला हॅरिसपेक्षा १५ मिनिटं जास्त...
esakal October 21, 2024 06:45 PM

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक अगदी पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे. येथे ५ नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प सत्तेत परताणार की कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनणार याचा निर्णय होईल. मात्र या निवडणुकीच्या पूर्वी येथील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे.

नुकतेच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे पेन्सिलवेनिया येथील मॅकडॉनल्ड्समध्ये गेल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाही तर येथे त्यांनी काम देखील केले. यावेळी ट्रम्प यांनी त्यांच्या विरोधक डेमोक्रॅटीक पक्षाच्या नेत्या कमला हॅरिस यांच्यावर निशाणा देखील साधला. ट्रम्प म्हणाले की, मी McDonald's मध्ये कमला हॅरिस यांच्यापेक्षा १५ मिनीट जास्त काम केलं. कमला हॅरिस यांनी दावा केला होता की जेव्हा त्या विद्यार्थी होत्या तेव्हा त्यांनी अमेरिकेत McDonald's मध्ये काम केले आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या याच दाव्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान McDonald's मध्ये काम करत असलेल्या ट्रम्प यांचा व्हिडीओ समोर आला आहे. ट्रम्प वॉर रूम या एक्स अकाउंटवरून तो पोस्ट करण्यात आला असून यावर भारभरून लाईक्स कमेंट केल्या जात आहेत.

मागील महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी इंडियाना आणि पेनसिल्वेनियामध्ये आपल्या प्रचार मोहिमेदरम्यान सांगितले होते की ते फ्राय खूक म्हणून काम करू इच्छितात. जेणेकरून ते कसं केलं जातं याबद्दल जाणून घेऊ शकतील. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीआधी दोन्ही उमेदवार पेन्सिलवेनियाचा दौरा करत आहेत. दोघांसाठीही हे राज्य जिंकणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे या दोघांनीही या राज्यात शेकडो मिलीयन डॉलर्स खर्च केले आहेत. दरम्यान अमेरिकेत ५ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या मतदानापूर्वी दोन्ही उमेदवारांमध्ये जोरदार लढत सुरू आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.