Maharashtra Politics: 'गोल्डनमॅन'चा मुलगा राजकारणात, खडकवासलामधून विधानसभा लढवणार; राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी
Saam TV October 21, 2024 06:45 PM
अक्षय बडवे, पुणे

मनसेचे पुण्यातील दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे सुपुत्र मयुरेश वांजळेंनी राजकारणात एन्ट्री घेतली आहे. मयुरेश वांजळे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मयुरेश वांजळे इच्छुक आहेत. निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. बहुतांश सर्व पक्षातील नेत्यांची मयुरेश वांजळे यांनी भेट घेतली आहे. ते नेमकं कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार आहेत हे अद्याप निश्चित झाले नाही.

अध्यक्ष यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची मयुरेश वांजळे यांनी भेट घेतली. अद्याप कोणत्या पक्षाकडून ते उभे राहणार याबाबत समजू शकलेले नाही. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून नागरिकांच्या भेटीगाठी सुरू आहेत. मयुरेश वांजळे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यामुळे खडकवासलामध्ये आता इतर पक्षांचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

मयुरेश वांजळे यांचे वडील रमेश वांजळे यांची पुण्यामध्ये गोल्डमन म्हणून ओळख होती. २००९ मध्ये रमेश वांजळे यांनी मनसेच्या तिकीटावर उमेदवारी घेत भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभूत केलं होतं. मनसेचे आमदार असताना त्यांनी मनसे स्टाइलने अनेक आंदोलनं देखील केली. २०११ मध्ये रमेश वांजळे यांचं निधन झालं. त्यांची कन्या सायली वांजळे ही त्या भागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगरसेवक आहे.

मतदारसंघाची रचना पाहायला गेलं तर या मतदारसंघाचा ७० टक्के भाग हा शहरी असून ३० टक्के भाग हा ग्रामीण आहे. खडकवासलामध्ये भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर असून त्यांच्याविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सचिन दोडके इच्छुक आहेत. लवकरच या मतदारसंघामध्ये इतर पक्षांकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.