Kalyan East Vidhansabha : कल्याण पूर्वेत काँग्रेस - ठाकरे गटात जागेवरून दावे प्रतिदावे
esakal October 21, 2024 06:45 PM

Latest Kalyan News: कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात दावे प्रतिदावे रंगत आहेत. 2019 च्या निवडणूकित ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली होती. तर 2009 व 2014 मध्ये काँग्रेसच्या वाट्याला गेली होती.

यंदा राज्यात महाविकास आघाडी असुन शिवसेना ठाकरे गटाकडे ही जागा जाण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने काँग्रेसने या जागेवर दावा केला आहे. ठाकरे गटाला उमेदवार आयात करावा लागेल, त्यापेक्षा आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत असा दावा काँग्रेसने केला आहे. तर आमच्याकडे तीन सक्षम उमेदवार असल्याचा प्रतिदावा ठाकरे गटाने केला आहे.

कल्याण पूर्व मतदारसंघ हा भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचा मतदारसंघ आहे. जमीन वादातून गोळीबार प्रकरणात गायकवाड हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील वादाचा फायदा करून घेत येथे शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसून आले.

तेव्हा पासून येथे ठाकरे गटाने जोर पकडल्याने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतून ही जागा ठाकरे गटाकडे जाईल असे बोलले जात आहे. ठाकरे गटातून येथे हर्षवर्धन पालांडे, धनंजय बोदारे, रमेश जाधव हे इच्छुक आहेत.

तर महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने देखील या जागेवर दावा केला आहे. इच्छुक असून काय होते, इथे सगळे शिंदे गटात गेले आहेत. आज त्याच्याकडे कोणी उमेदवार नाही. आयात उमेदवार करायचे असतील तर ती परिस्थिती काँग्रेसकडे नाही.

काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहेत. चुकून काही घडामोडी घडल्या आणि काँग्रेस पक्षाला जर एकटे लढण्याची वेळ आली तर आम्ही ही सीट लढवणार असा दावा काँग्रेसचे नवीन सिंग यांनी केला आहे.

याला शिवसेना ठाकरे गटाचे रमेश जाधव यांनी प्रतिदावा करत आमच्याकडे तीन सक्षम उमेदवार असल्याची बतावणी केली आहे. जाधव म्हणाले,

महाविकास आघाडीच्या वतीने काय निवेदन करायला हे त्यांना समजायला हवं होत. परंतु आज जर ते बोलत असतील की शिवसेनेत उमेदवार नाही तर शिवसेनेमध्ये तीन उमेदवार आहेत. पक्षाच्या सिस्टीम मुळे आम्ही काही बोलू इच्छित नाही.

कारण महाविकासआघाडी या ठिकाणी टिकवायची आहे. त्यामुळे यावर भाष्य करणे टाळलेला आहे मी स्वतः इथून इच्छुक असून आणखी दोन उमेदवार आमच्याकडे आहेत असे त्यांनी सांगितले.

यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेस व ठाकरे गटात कल्याण पूर्वेच्या जागेसाठी रस्सीखेच सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.