राजकीय वातावरण अजून थंडच
esakal October 22, 2024 10:45 PM

राजकीय वातावरण अजून थंडच

निवडणूक अन् दिवाळी; पक्ष कार्यालयांना गर्दीची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २१ ः विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून आचारसंहिताही लागू झाली आहे. ऐन दिवाळी सणात ही निवडणुक होत आहे. यात सद्यस्थिती पाहता कुडाळ-मालवण मतदारसंघात निवडणुकीपेक्षा दिवाळी सणाच्या तयारीतच सर्वजण व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या कार्यालयातील गर्दीही कमी झाली आहे. परिणामी सध्या तरी सर्वत्र आलबेल असल्याचेच वातावरण पहावयास मिळत आहे. पक्षांकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच येथील राजकीय वातावरण तापणार असल्याचे दिसून येत आहे.
कोकणात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या अनुषंगाने व्यावसायिकही चांगले उत्पन्न मिळावे यासाठी पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सज्ज असतात. मात्र, यावर्षी ऐन दिवाळी सुटीच्या काळातच विधानसभा निवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी आचारसंहिताही लागू झाल्याने दिवाळी सुटीच्या हंगामात पर्यटक येथे पाठ फिरविण्याची जास्त शक्यता असल्याने पर्यटन व्यावसायिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर असल्याने सर्वसामान्य, व्यावसायिक त्यादृष्टीने आपापल्या तयारीत मग्न असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीचा विचार करता ठाकरे गटाकडून विद्यमान आमदार वैभव नाईक यांना उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुख नीलेश राणे हे निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट आहे. मात्र, अद्यापही पक्षाकडून त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर नाही. त्यामुळे जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही. तोपर्यंत येथील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे नाहीत.
ओबीसी आरक्षित समाज महासंघानेही या मतदारसंघात आपला उमेदवार देण्याचे निश्चित केले आहे. या पार्श्वभूमीवर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून गेले दोन दिवस तालुक्यातील विविध ठिकाणी बैठका घेऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केल्या जात आहेत. कुडाळ व मालवण मतदार संघातही कार्यकर्त्यांच्या, जाणकारांच्या गाठीभेटी घेऊन उमेदवाराबाबत चाचपणी केली जात आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षित समाज संघाकडून कोणता उमेदवार या मतदारसंघात दिला जातो याकडेही सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, उमेदवारांना मतदारांच्या रोषाला तर सामोरे जावे लागणारच आहे. शिवाय आपण का योग्य आहोत हे पटवून देण्याबरोबरच सर्वसामान्यांचे, नवमतदारांचे मतपरिवर्तन करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार असल्याची चिन्हे आहेत. यात कोण यशस्वी होणार? याचे उत्तरही येत्या काळात दिसून येणार आहे.
----
नवमतदारांमध्ये नाराजी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नवमतदारांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली असता त्यांच्यामध्येही विविध पक्षांच्या उमेदवारांबाबत नाराजी आहे. पक्षांचे उमेदवार हे आपणच कसे योग्य आहोत हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्याचा, मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, खरचं या उमेदवारांनी चांगले काम केले आहे का? असा प्रश्न आम्हाला पडला आहे. शिवाय सत्ताधारी, विरोधक हे आता निवडणूक काळात सोशल मीडियावरून एकमेकांवर टीका, टिपण्णी, शेरेबाजी करताना दिसतात. मग ही मंडळी पाच वर्षे झोपली होती का? असा प्रश्न नवमतदारांना पडल्याचे अनेकांनी सांगितले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.