निवडणूक मान्य पण लढा असून संपला नाही! ट्रम्प यांचा विजय झाल्यावर कमला हॅरिस यांची भावनिक प्रतिक्रिया...
Times Now Marathi November 07, 2024 05:45 PM

Kamala Harris Concede Election: अख्ख्या जगाचे लक्ष लागून होते ते म्हणजे अमेरिकेच्या निवडणुकांकडे. कारण यंदा समोरासमोर होते डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस. 5 नोव्हेंबर रोजी अमेरिकेत 50 राज्यांमध्ये ही निवडणूक पार पडली. त्यातून दुसऱ्याच दिवशी लागलेल्या निकालानंतर जगभरातून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अनेक वर्ल्ड लीडर्सनी यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्रम्प यांचे अभिनंदन केले. काही तासांपूर्वीच अमेरिकेच्या निवडणूकांचा निकाल जाहीर झाला. सुरूवातीपासूनच डोनाल्ड ट्रम्प हे आघाडीवर होते. बहुमतासाठी या दोघांना 270 हा आकाडा पार करणे अत्यावश्यक होते. सरतेशेवटी आलेल्या निकालानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुमताचा आकाडा पार केला.

अनेक राज्ये ही ट्रम्प यांच्या खात्यात गेली. त्यातूनही यावेळी सर्वात महत्त्वाचे राज्य होते ते म्हणजे पेन्सिलव्हेनिया. हे राज्यही ट्रम्प यांच्या खात्यात आले आहे. 295 इतकी इलेक्टोरियल मतं ही यांना मिळाली आहेत. तर या काहीश्या फरकाने मागे राहिल्या. त्यांना 226 इतकी इलेक्टोरियल मतं मिळाली. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुमताचा आकाडा पार केला आहे. 'असोसियेट प्रेस'ने याची माहिती दिली आहे. यावेळी ट्रम्प यांनी मतदारांचे आभार मानले.

यंदाच्या निवडणुकांमध्ये कमला हॅरिस यांचा पराभूत झाला. जर का त्या विजयी झाल्या असत्या तर अमेरिकेच्या इतिहासातल्या त्या पहिल्यावहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष झाल्या असत्या. यावेळी दुसऱ्यांदा विजयी होऊन डोनाल्ड ट्रम्प यांनीही इतिहास घडवला आहे. कमला हॅरिस यांनी निवडणुक निकालानंतर उशिराने या निकालावर प्रतिक्रिया दिली. सोबतच डेमोक्रेटिक पक्षाच्या समर्थकांशीही संवाद झाला. हा निवडणुकीचा निर्णय आपल्याला मान्य असल्याचे त्यांनी सांगितले परंतु लढा अद्याप संपलेला नाही, असं त्या म्हणाल्या.

यावेळी कमला हॅरिस म्हणाल्या, ''या निवडणुकीचा परिणाम जसा आम्हाला हवा होता तसा तो नक्कीच नाहीये. परंतु आम्ही आजही अमेरिकेतील नागरिकांसाठी वचनबद्ध आहोत. आम्ही कधीच हार मानणार नाही. त्यामुळे आम्ही लढा हा देतच राहणार.'', असं त्या म्हणाल्या.

''मी अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलले आहे. मी त्यांना हे सांगितले आहे की, आम्ही त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करू. या बदल आम्ही अगदी शांततापूर्ण स्विकारतो. या देशात, आम्ही केवळ पक्ष आणि राष्ट्राध्यक्षांशीच नाही तर अमेरिकेच्या संविधानाशी, आमच्या कर्तव्याशी आणि देवाशी प्रामाणिक आहोत. या तिघांशीही माझी निष्ठा आहे. याचे कारण म्हणजे ही निवडणूक मी मान्य करते परंतु ज्या उर्जेने आम्ही प्रचार केला आणि ज्याप्रकारे आम्ही मेहनत घेतली आहे त्यामुळे आम्ही हा लढा सुरूच ठेवू. अमेरिकेच्या नागरिकांची स्वप्नं, ध्येय, महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मी हा लढा देणे सुरूच ठेवणार आहे.'', असंही त्या म्हणाल्या.


यावेळी शाळेत, महाविद्यालयात गोळीबारामुळे होणारी हिंसा, महिला गर्भपात अशा विषयांवरही त्यांनी भाष्य केले आहे. सोबतच कायदा, न्याय, मानवी हक्क आणि अधिकार यांचाही त्यांनी उल्लेख केला आहे. कमला हॅरिस म्हणाल्या की, ''काहीवेळा लढा हा फार काळ सुरू राहतो. सोबतच विजय मिळायला उशीरही होतो पण त्याचा अर्थ असा नाही की आम्ही जिंकणारच नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रयत्न न सोडणे.'', असं त्यांनी सांगितले.

''जेव्हा अंधार असतो तेव्हाच तारे आकाशात चमकताना दिसतात. अनेकांना असं वाटतं की, आता आम्ही अंधारात आलो आहोत. परंतु हे असे नाही पण जर असेल तर नक्कीच या अंधारात आम्ही अनेक तारे चमकवू आणि अमेरिकेच्या नागरिकांसाठी या संघर्षातून पुढे जात त्याच जिद्दीने लढू आणि त्यांचे वचन पूर्ण करण्याकडे वाटचाल करू.'' कमला हॅरिस यांनी अधिकृत इन्स्टाग्राम अकांऊटवरून ही पोस्ट शेअर केली आहे.
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.