काटेवाडी, ता. ७ : काटेवाडी (ता. बारामती) येथे ऐन उन्हाळ्यामध्ये लागवड केलेल्या केळी बागेला सध्या चांगला बहर आलेला आहे. उन्हाळ्यात केळी पिकाला सनबर्निंगचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. मात्र यावर मात करत येथील प्रगतशील शेतकरी यतिन घुले यांची केळी सध्या आखाती देशांमध्ये निर्यात होऊ लागली आहे. घुले कुटुंबाने एक नोव्हेंबरला सहा टन केळीची निर्यात केली. या केळीस त्यास प्रतिकिलो २५ रुपये असा बाजारभाव मिळाला आहे.
बारामती इंदापूर तालुक्यातील बागायती पट्ट्यामध्ये जून जुलै महिन्यामध्ये केळीची लागवड होत असते. मात्र घुले यांनी उन्हाळ्याच्या अगदी सुरुवातीलाच म्हणजे फेब्रुवारी महिन्यात दोन एकरावर केळीची लागवड केली. फेब्रुवारीमध्ये उन्हाचा चटका जरा कमी होता. मात्र यानंतर मार्च, एप्रिल व मे महिन्यामध्ये सनबर्निंग वाढू लागले. तसेच तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यावर झाडांची प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते. तीव्र सूर्यप्रकाशामुळे पानांची पश्चिमेकडील कडा करपते. नवीन लागवड केलेल्या रोपांच्या पानांची सुरळी होऊन पाने उमलत नाहीत. पाने पांढरी राहून करपतात. करपलेल्या ठिकाणी काळे डाग उमटतात. तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यावर झाडांमधील पाण्याचे होणारे उत्सर्जन बाष्पीभवनाद्वारे वेगाने होते. झाडांमधील विकर आणि संप्रेरकांची कार्यक्षमता कमी होते.
दोन एकरांतून ५० टन उत्पादन अपेक्षित
घुले यांनी केळीला रात्रीचे पाणी दिल्यामुळे मुळांमध्ये गारवा राहिला. परिणामी सनबर्निंग देखील घटण्यास मदत झाली. उष्ण वातावरणामुळे अवघ्या आठ महिन्यातच बागेतील पहिला बहर काढणीस आला. एक नोव्हेंबरला पहिले हार्वेस्टिंग झाले. यामध्ये सहा टन माल निघाला. उन्हाळ्यातील लागवडीमुळे उत्पादनामध्ये घट आली असली तरी निर्यातक्षम केळी टिकवण्यात घुले यांना यश आले. त्यांचे आतापर्यंत ८० हजार रुपये उत्पादन खर्च झाला आहे. तर त्यांना दोन एकरातून ५० टन उत्पादन अपेक्षित आहे.
केळी बागेची घेतलेली काळजी...
१. बागांची टिचणी बांधणी केली. झाडांना मातीने आधार दिला.
२. वाफ्यातील माती भुसभुशीत केली. यामुळे जमिनीचे तापमान योग्य राखले
३. झाडाच्या मुळांना इजा पोचत नाही. तसेच मुळांची कार्यक्षमता योग्य राखली जाते.
४. मुख्य खोडाजवळीली पिल्ले जमिनीलगत नियमित ३ ते ४ आठवड्यांच्या अंतराने धारदार विळीने कापली.
५. मुख्य पिकासोबत पिल्लांची सूर्यप्रकाश, हवा, पाणी आणि अन्नद्रव्यांसाठी कमी स्पर्धा झाली.
६. घडातील फण्या पूर्ण निसवल्यानंतर शेवटच्या फणीपासून थोडे अंतर ठेवून केळफूल कापले.
७. कापलेली केळफुले बागेत तशीच न टाकता नष्ट केली
थोडीशी काळजी घेऊन उन्हाळ्यामध्ये केळी लागवड केल्यास केळीचे उत्पादन चांगले मिळते. सध्या निर्यातक्षम केळीची कमतरता बाजारात जाणवत आहे. त्यामुळे एखादी देशांमध्ये मला चांगला दर मिळाला. आता लवकरच सुमारे सहा ते सात टनांचे उत्पादन मिळेल.
- यतिन घुले, केळी उत्पादक शेतकरी, काटेवाडी
60769