हिवाळा ऋतू सुरू झाला की अनेक प्रकारचे त्वचेशी संबंधित समस्याही सुरू होऊ लागतात. गारठवणारी थंडी आपल्या त्वचेप्रमाणेच आपल्या ओठांवरही परिणाम करते. थंडीमध्ये लोक ओठ फाटण्याची अनेकदा तक्रार करतात. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे आपले ओठ कोरडे पडू लागतात. त्यामुळेच ओठांच्या साली निघू लागतात. आणि कधीकधी यातून रक्तदेखील येऊ लागते. हिवाळ्यात सुकलेल्या ओठांपासून सुटका मिळवण्यासाठी लोक अनेक प्रकारचे लिप बाम आणि क्रिम लावत असतात. परंतु यामुळे ही समस्या संपत नाही. याचे काही साईड इफेक्टसही आपल्याला पहायला मिळतात. हिवाळ्यात कोरड्या ओठांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घरगुती उपायदेखील अंगिकारू शकता. जाणून घेऊयात अशा काही उपायांविषयी.
गुलाब जलामध्ये ग्लिसरीन मिसळून ओठांवर लावल्याने कोरड्या ओठांच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. यासाठी एक चमचा गुलाब जलामध्ये एक चमचा ग्लिसरीन मिसळा. याला कापसाच्या मदतीने ओठांवर लावा आणि थोड्या वेळाकरता सुकू द्या. त्यानंतर पाण्याने धुवून घ्या. याच्या रेग्युलर वापरामुळे ओठ मुलायम आणि गुलाबी बनतील.
फाटलेल्या ओठांपासून वाचण्यासाठी तुम्ही मधाचा वापर करू शकता. यामध्ये मॉइश्चरायझिंग गुण असतात. जे ओठांना फाटण्यापासूमन आणि सुकण्यापासून वाचवतात. याकरता तुम्हाला मध 5 ते 10 मिनिटांसाठी ओठांवर लावून ठेवायचे आहे. त्यानंतर ओठ पाण्याने धुवून घ्या. मधात असणारे नैसर्गिक घटक ओठांचा काळेपणा दूर करण्यास मदत करतात.
नारळाच्या तेलामध्ये अनेक प्रकारची पोषकतत्त्वे असतात. यामध्ये अँटिबेक्टेरियल आणि अँटिइंफ्लेमेटरी गुण असतात. ज्यांच्यामुळे फाटलेल्या ओठांची समस्या दूर होते. हे ओठांना होणाऱ्या संसर्गापासूनही आपला बचाव करतात. याकरता कापसाला नारळाच्या तेलामध्ये बुडवून ओठांना लावा. दिवसातून 4 ते 5 वेळा असं केल्यास तुमचे ओठ कोरडे पडणार नाहीत. सोबतच ओठांचा काळपटपाही दूर होईल.
फाटलेल्या ओठांना ठीक करण्यासाठी तूपाचा वापर करण्याचा सल्ला आजीच्या जमान्यापासून आपल्याला दिला जातोय. ओठांवर तूप लावल्याने ओठ लवकर सुकत नाहीत. आणि गुलाबीही होऊ लागतात. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर शुद्ध तूप लावा. सकाळी उठल्यानंतर साध्या पाण्याने हे धुवून घ्या. नियमितपणे हे केल्याने तुमचे ओठ अगदी मुलायम होऊ शकतील.
हेही वाचा : Kitchen Tips : फ्रिजमध्ये खाद्यपडार्थच नाही तर ठेवू शकता या गोष्टी
संपादन- तन्वी गुंडये